विदर्भातील लोकर उत्पादकांना हवी बाजारपेठ !
By admin | Published: December 9, 2015 02:42 AM2015-12-09T02:42:59+5:302015-12-09T15:48:33+5:30
वर्षाकाठी ७४.६८ मे.टन लोकरीचे उत्पादन.
नीलेश शहाकार/बुलडाणा: शेतीला पूरक असलेल्या विदर्भातील लोकर व्यवसायाला स्थानिक बाजारपेठ नसल्यामुळे घरघर लागली आहे.
पशुपालन व्यवसाय हा राज्याच्या अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग आहे. शेळी-मेंढीपालन व्यवसायातून दुष्काळी भागात मेंढपाळ शेतकर्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. विशेषत: अल्पभूधारक शेतकरी व धनगर समाजाचा हा प्रमुख व्यवसाय आहे. विदर्भातील सहा जिल्ह्य़ात वर्षाला साधारणत: ७४.६८ मे. टन लोकर निर्मिती होते. ग्रामीण शेतकर्यांसाठी हा शेतीपूरक व्यवसाय असला, तरी अतिपाऊस, रोगराई यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे मेंढय़ा मृत्युमुखी पडण्यामुळे अनेकदा मोठे आर्थिक नुकसानही सहन करावे लागते. विदर्भात लोकरीसाठी कुठलीही संघटित बाजारपेठ नसल्यामुळे लोकरीला योग्य बाजारभाव मिळत नाही. त्यामुळे हा व्यवसाय पुढे टिकून राहणे कठीण होत असून, विदर्भातील लोकर व्यवसायाला चालना व बाजारपेठ उपलब्ध करून देणे गरजेचे झाले आहे.
लोकरीसाठी हरयाणा, पंजाबची बाजारपेठ
मेंढय़ापासून वर्षातून दोनदा लोकर प्राप्ती केली जाते. जून-जुलैत पहिल्यांदा आणि सहा महिन्यानंतर लोकर काढली जाते. एका मेंढीपासून सरासरी ५८५ ग्रॅम लोकर मिळते. एकूण प्राप्त झालेल्या लोकरीपैकी २0 टक्के लोकर घोंगड्या व लोकरी कापड उत्पादनासाठी तर उर्वरित ८0 टक्के लोकर उत्तरेकडील राज्यातील हरियाणा, पंजाब येथील व्यापारी, मिलमालक लष्करासाठी लागणार्या बरॅक ब्लँकेटच्या उत्पादनासाठी खरेदी करतात.
लोकर खरेदी बाजारपेठ नाही
विदर्भातील बुलडाणा, अमरावती, वाशिम, यवतमाळ, अकोला, वर्धा या सहा जिल्ह्यात वर्षाला ७४.६८ मे.टन लोकर निर्मिती केली जाते. यातून शेतकरी व मेंढपाळाला चांगले उत्पन्न मिळू शकते; मात्र विदर्भात लोकरीसाठी मुख्य बाजारपेठ उपलब्ध नाही. सातारा, सोलापूर, सांगली, अहमदनगर, पुणे, जालना, बीड, नशिक, औरंगाबाद येथे बाजारपेठा आहेत; मात्र तेथे लोकर नेऊन विकणे शेतकर्यांना परवडणारे नाही.
२0१५ मध्ये झालेले सहा जिल्ह्यातील वार्षिक लोकर उत्पादन
जिल्हा लोकर(मे.टन) मेंढी
बुलडाणा ५२.२७ ८१९0१
अमरावती १३.७0 ५८४0९
वाशिम 0.७५ १0६४८
यवतमाळ ५.११ २0१५२
अकोला 0.६५ ६८३१
वर्धा २.२0 २४७२
एकूण ७४.६८ १,८0४१३