VIDEO- एटीएमची सुरक्षा वाऱ्यावर !
By admin | Published: September 25, 2016 03:52 PM2016-09-25T15:52:12+5:302016-09-25T15:52:12+5:30
नागरिकांना २४ तास पैसे काढण्याची सोय म्हणून शहरात सर्वच राष्ट्रीयीकृत व खासगी बँकांनी एटीएम उभारले
ऑनलाइन लोकमत
अकोला, दि. 25 - नागरिकांना २४ तास पैसे काढण्याची सोय म्हणून शहरात सर्वच राष्ट्रीयीकृत व खासगी बँकांनी एटीएम उभारले आहेत. शहरातील जवळपास सर्वच एटीएमला कोणतीच सुरक्षा नसल्याने या एटीएम मशिन रामभरोसे असल्याचे चित्र दिसत आहे. तुटलेले दरवाजे, फुटलेल्या काचा, बंद पडलेली वातानुकूलन यंत्रणा, सुरक्षारक्षकांचा अभाव यामुळे एटीएमची सुरक्षा धोक्यात आहे.
एटीएम मशिनमधून पैसे काढण्यासाठी ठरावीक वेळा व्यवहार केल्यानंतर पुढील व्यवहारांसाठी शुल्क आकारले जाते. ज्या अर्थी या बँकांकडून अतिरिक्त सेवा शुल्क आकारले जाते, त्याअर्थी बँकेने सुसज्ज एटीएम सेंटर उपलब्ध करून देणे अपरिहार्य आहे. मात्र अनेक ठिकाणी वातानुकूलन यंत्रणा बंद पडलेली असते. एटीएममध्ये जाण्यासही काही महिला धजावत नाहीत. अशा सेंटरवर पुरेपूर सुरक्षायंत्रणा असणे आवश्यक आहे. तसेच अनेक एटीएम सेंटरमध्ये आगप्रतिबंधात्मक यंत्रणाही नाही. आपत्कालीन परिस्थितीत धोक्याची सूचना देणारा भोंगा नसतो. या सर्व समस्यांवर तोडगा काढावा, अशी मागणी होत आहे. एटीएम सेंटरवर सुरक्षेसाठी तैनात असलेल्या सुरक्षारक्षकांकडे सुरक्षेची साधने अतिशय तोकडी असतात. अनेक जणांकडे लाठीसुद्धा नसते. त्यामुळे समाजकंटकांकडून काही अनुचित प्रकार करण्याचा प्रयत्न केल्यास या सुरक्षारक्षकांकडून काहीच प्रतिकार होणार नाही. बचावासाठी त्यांच्याकडे साधन नसल्यास त्यांना गंभीर इजा अथवा जीव गमवावा लागेल. त्यामुळे शस्त्रसज्ज सुरक्षारक्षक तैनात असणे आवश्यक असते.
स्वयंचलित दरवाजे नाहीत
एटीएमचे दरवाजे आधुनिक यंत्रणेनुसार व्यक्ती आत गेल्यानंतर बंद होणे व व्यवहार केल्यानंतर उघडणे गरजेचे आहे. मात्र, शहरातील एकाही एटीएम सेंटरवर ही यंत्रणा सुरू नाही. त्यामुळे एखादी व्यक्ती पैसे काढण्यासाठी गेल्यानंतर अनेक वेळा दुसरी व्यक्ती दरवाजाच्या आत येऊन थांबलेली असते. अनेक एटीमएची दारे सताड उघडी असतात. एकाच वेळी दोन ते तीन व्यक्ती आतमध्ये घुसतात. यामुळे पैसे काढणाऱ्याची सुरक्षा धोक्यात येऊ शकते.