VIDEO : आकोटात साजरा झाला झेंडवाई उत्सव
By admin | Published: November 2, 2016 02:24 PM2016-11-02T14:24:01+5:302016-11-02T14:58:34+5:30
आकोट शहरात गेल्या कित्येक वर्षांपासून झेंडवाई उत्सव साजरा करण्यात येतो. हा उत्सव गुरांच्या पूजनासाठी ओळखला जातो.
Next
ऑनलाइन लोकमत
आकोट, दि. २ - आकोट शहरात गेल्या कित्येक वर्षांपासून झेंडवाई उत्सव साजरा करण्यात येतो. हा उत्सव गुरांच्या पूजनासाठी ओळखला जातो. झेंडवाई हा सण पारंपारिक शेती संस्कृतीचा एक अभिन्न अंग आहे. या उत्सवातील झेंडवाई ही झेंडूची फुले व गवतापासून बनविलेली असते. गोठाणावर त्याची गवळणींच्या हस्ते पूजा करण्यात येते. त्यानंतर गाय गुरांख्यांवर आधारीत असलेली लोकगीते आळवीत, वाद्यांच्या गजरात ही मिरवणूक परिसरातील पशुपालकांच्या दारावर जाते. झेंडवाईतील गुराखी हे गोधनाची श्रीमंती, आरोग्य व पुराणातील असलेल्या त्यांच्या संबंधावरील लोकगिते सादर करतात. यावेळी वर्षभर सेवा करणा-या या गुराख्यांना धान्य, कपडे व बिदागी पशुपालक देतात.
अनेक गावाांमधून झपाट्याने लुप्त होणारा हा उत्सव सध्या आकोट शहरातील मोठे बारगण, रामटेकपूरा या भागात वर्षानुवर्षे साजरा होतो. दिवसेंदिवस घटणारे गोधन व गुराख्यांमुळे हा उत्सव आता हळूहळू लोप पावत चालला आहे. लोप पावत चाललेल्या अशा अनेक प्रथा - परंपरा कायम राहाव्यात या हेतूने भूमि फाउंडेशनने पारंपारिक व पुरातन झेंडवाई उत्सव साजरा करणा-या गुराख्यांचा सत्कार केला.
स्थानिक पानअटाई येथे भूमी फाउंडेशनच्या वतीने गुराख्यांचा शाल, श्रीफळ व स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी या उत्सवानिमित्त काढण्यात आलेल्या झेंडवाईतील पारंपारिक लोकगितांच्या मधुर स्वरांनी वातावरण भारावून गेले होते. या गुराखी सन्मान सोहळ्यात पारंपारिक झेंडवाई या उत्सवाचे जतन करणारे वयोवृध्द रामकृष्ण तेलगोटे व त्यांचे सहकारी किसन तेलगोटे, कैलास अंभोरे, संजय पळसपगार, ज्ञानेश्वर अढाऊ, पंजाब पाचपोहे यांचाही सत्कार करण्यात आला. याप्रसंगी भूमी फाउंडेशनचे अध्यक्ष तुषार अढाऊ, सचिव चंचल पितांबरवाले, लोकसाहित्याचे अभ्यासक प्रा.श्रीकृष्ण काकडे, पंकज अंबुलकर, पत्रकार संतोष विणके आदींची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाला बहुसंख्य पशुपालक, गुराखी व नागरिकांची उपस्थिती होती.