VIDEO- 'अमर रहे'च्या जयघोषात शहिदांना अखेरचा निरोप
By Admin | Published: February 1, 2017 04:26 PM2017-02-01T16:26:07+5:302017-02-01T16:38:39+5:30
ऑनलाइन लोकमत अकोला, दि. 1 - काश्मीरमध्ये हिमस्खलनात शहीद जवान आनंद गवई व संजय खंडारे यांच्या पार्थिवावर बुधवारी सकाळी ...
ऑनलाइन लोकमत
अकोला, दि. 1 - काश्मीरमध्ये हिमस्खलनात शहीद जवान आनंद गवई व संजय खंडारे यांच्या पार्थिवावर बुधवारी सकाळी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. अमर रहे-अमर रहे शहीद जवान अमर रहे, भारत माता की जयच्या घोषात शहिदांना शोकाकुल वातावरणात अखेरचा निरोप देण्यात आला.
काश्मीरमधील हिमस्खलनात अकोल्यातील वाशिम रोडस्थित पंचशीलनगरमधील आनंद शत्रुघ्न गवई आणि मूर्तिजापूर तालुक्यातील माना येथील संजय सुरेश खंडारे यांना २५ जानेवारी रोजी वीरमरण आले. १३ महार रेजिमेंटचे जिल्ह्यातील दोन जवान शहीद झाल्याने, जिल्ह्यात शोककळा पसरली. दोन्ही शहीद जवानांचे पार्थिव गत सोमवारी श्रीनगरमध्ये पोहोचले. शवविच्छेदनानंतर श्रीनगर येथून विमानाने शहीद जवानांचे पार्थिव मंगळवारी दिल्लीत आणण्यात आले. दिल्ली येथून विमानाने त्यांचे पार्थिव मंगळवारी रात्री ८.३० वाजता नागपूर येथे आणण्यात आले. नागपूर येथून लष्कराच्या वाहनाने शहीद जवानांचे पार्थिव रात्री २ वाजता अकोल्यात आणण्यात आले.
बुधवारी सकाळी अकोल्यातील वाशिम रोडस्थित पंचशिल नगरमधून शहीद आनंद गवई यांची अंंत्ययात्रा काढण्यात आली. गीता नगरस्थित स्मशानभूमीत आनंद यांच्यावर तर माना येथे संजय खंडोर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी शहिदांचे कुटुुंबीय, राजकीय नेते, विविध शासकीय संघटना, सैनिक दल, पोलीस विभाग आणि जिल्हा प्रशासनामार्फत पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. पोलीस आणि सैन्य दलाच्या जवानांनी हवेत तीन फैरी झाडून मानवंदना दिली.