VIDEO : चित्र-विचित्रला निर्मिती, दिग्दर्शनाचे प्रथम पारितोषिक; अ.भा. मराठी नाट्य परिषद विभागीय एकांकिका स्पर्धा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2017 10:18 PM2017-09-12T22:18:41+5:302017-09-12T22:19:05+5:30
अकोला, दि. 12 - अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबईच्यावतीने आयोजित डॉ. लक्ष्मणराव देशपांडे एकांकिका स्पर्धेची विदर्भ विभागीय प्राथमिक फेरी ...
अकोला, दि. 12 - अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबईच्यावतीने आयोजित डॉ. लक्ष्मणराव देशपांडे एकांकिका स्पर्धेची विदर्भ विभागीय प्राथमिक फेरी अकोल्यातील श्री शिवाजी महाविद्यालयातील वसंत सभागृह येथे मंगळवारी घेण्यात आली. या स्पर्धेत अमरावती शाखेच्या चित्र-विचित्र नाटकाने सर्वाधिक पारितोषिक पटकावली. निर्मिती व दिग्दर्शनात चित्र-विचित्रने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकाविले.
सकाळी स्पर्धेचे उद्घाटन अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबईचे प्रमुख कार्यवाह दीपक करंजीकर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी नियामक मंडळाचे सदस्य दिलीप देवरणकर, प्राचार्य डॉ. सुभाष भडांगे, ज्येष्ठ नाट्य कलावंत दिलीप देशपांडे, अकोला-मलकापूर शाखा अध्यक्ष प्रा.मधू जाधव, कार्याध्यक्ष डॉ. गजानन नारे व्यासपीठावर विराजमान होते. करंजीकर यांनी मार्गदर्शन केले.
स्पर्धेत एकूण पाच नाटके सादर करण्यात आली. यामध्ये दर्दपोरा अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मलकापूर-अकोला शाखेने सादर केले. यामधील स्त्री कलावंत वैष्णवी जोशी हिने अभिनयाचे द्वितीय पारितोषिक मिळविले. अकोला शाखेने अल्पविराम सादर केले. लेखन इरफान मुजावर यांचे, तर दिग्दर्शन अनिल कुळकर्णी यांचे होते. डॉ. ज्ञानसागर भोकरे व मयूर भालतिलक यांनी अभिनय केला. या नाटकातील दोन्ही पात्रांना अभिनयाचे उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. कारंजा लाड शाखेने उंच माझा झोका गं नाटक केले, तर अमरावती शाखेचे चित्र-विचित्र नाटक ाने रसिकांची दाद मिळविली. आजच्या युवापिढीची राजकारण, समाज व्यवस्थेमुळे होत असलेली मनाची घुसमट युवा कलावंतांनी मांडली. पथनाट्याद्वारा जनजागृती करीत असलेले युवक पुढे नक्षलवादी बनतात, असे यामध्ये दाखविले. नक्षलवाद्यांच्या जीवनावर आधारित या नाटकाने प्रत्येक संवादावर प्रेक्षकांच्या टाळ्या मिळविल्या. चित्र-विचित्रने निर्मितीचे प्रथम पारितोषिक आणि दिग्दर्शनाचे प्रथम पारितोषिक पटकाविले. नाटकाला विशाल तराळ यांचे दिग्दर्शन लाभले. अभिनयामध्ये श्रीवेश पांडे याने द्वितीय क्रमांक मिळविला. नागपूर महानगर शाखेने अॅट द रेट तमन्ना नाटक सादर केले. या नाटकालाही प्रेक्षकांनी दाद दिली. तमन्नाला निर्मितीचे आणि दिग्दर्शनाचे द्वितीय पारितोषिक मिळाले. सलीम शेख यांचे दिग्दर्शन तमन्नाला लाभले, तर अभिनयाचे प्रथम पारितोषिक तमन्नातील पुरुष कलावंत सचिन गिरी यांनी पटकाविले. स्त्री कलावंत मंजिरी सोळंके, वैष्णवी बडगे आणि निशिगंधा तिडके यांनी अभिनयाचे उत्तेजनार्थ पारितोषिक मिळविले.