VIDEO : राजराजेश्वर मंदिरात उसळला जनसागर
By Admin | Published: February 24, 2017 03:57 PM2017-02-24T15:57:06+5:302017-02-24T16:12:00+5:30
ऑनलाइन लोकमत अकोला, दि. २४ - अकोला शहराचे आराध्य दैवत म्हणून नावलौकिक असलेल्या श्री राजराजेश्वर मंदिरात महाशिवरात्री उत्सव आयोजित ...
ऑनलाइन लोकमत
अकोला, दि. २४ - अकोला शहराचे आराध्य दैवत म्हणून नावलौकिक असलेल्या श्री राजराजेश्वर मंदिरात महाशिवरात्री उत्सव आयोजित करण्यात आला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदासुद्धा महाशिवरात्रीच्या दिवशी मंदिरात भाविकांचा जनसागर उसळला.
अकोल्यातील राजराजेश्वाराचे मंदिर हे अत्यंत पुरातन असून, ६00 ते ७00 वर्षांपूवीपासून असलेले सांगितल्या जाते. शिवपिंडसुद्धा जुनी खडकात कोरलेली आहे. भक्तांवर दया करणारा आणि अडचणीच्या क्षणी त्यांच्या हाकेला धावून जाणाºया राजराजेश्वरावर अकोलेकारांची अपार श्रद्धा आहे. दरवर्षी शेवटच्या श्रावण सोमवारी राजराजेश्वराला पूर्णेच्या पाण्याचा अभिषेक करण्यासाठी निघणारी पालखी व कावड यात्रेची ख्याती संपूर्ण देशात पसरली आहे. महाशिवरात्रीचा उत्सवसुद्धा दरवर्षी उत्साहात साजरा केला जातो. महाशिवरात्रीनिमित्त शुक्रवारी श्री राजराजेश्वर मंदिरात पहाटेपासून विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. पहाटेपासूनच मंदिरात भाविकांनी दर्शनसाठी गर्दी केली. दुपारी दर्शनासाठी भाविकांच्या मोठ्या रांगा लागल्याचे चित्र आहे. परिसरात विविध वस्तू विक्रेत्यांची दुकाने लावल्यामुळे परिसराला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. (प्रतिनिधी)
मंदिराबाबत दंतकथा प्रसिद्ध
राजेश्वर मंदिराबाब एक दंतकथा प्रसिद्ध आहे. पूर्वी मोर्णा नदीकाठी आणि मंदिराच्या शेजारी असलेल्या असदगड किल्ल्यात अकोलसिंह नावाचा राजा राहत होता. त्यावेळेस त्याची पत्नी राजराजेश्वराची भक्त होती. ती दररोज सूर्योदयापूर्वी अंधारातच किल्ल्याबाहेर पडून महादेवाची पूजा करण्यासाठी जात असे. दररोज सकाळी न सांगता ती बाहेर जात असल्यामुळे राजाला संशय आला आणि एके दिवशी रागाने तो पाठलाग करू लागला. त्या दिवशी ती महादेवाच्या मंदिरात जात असल्याचे बघून तो संतापला आणि तिला मारण्यासाठी मागे धावला. राणी घाबरून राजेश्वराच्या धावा करू लागली. तेव्हा तिची प्रार्थना ऐकून तिला वाचवण्यासाठी महादेवाची पिंड दोन भागात विभाजित झाली व राणीला आपल्यात सामावून घेतले. तेव्हापासून येथे राजराजेश्वराचे मंदिर असल्याचे भाविक सांगतात.
https://www.dailymotion.com/video/x844sgl