vidhan sabha 2019 : अकोला पश्चिमचा गुंता कायमच; इच्छुकांचा जीव टांगणीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2019 12:11 PM2019-09-24T12:11:31+5:302019-09-24T12:11:38+5:30
अकोला पश्चिम व बाळापूर विधानसभा मतदारसंघाचा गुंता सोमवारी मुंबईत झालेल्या बैठकीतीही सुटला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: काँग्रेस-राष्टÑवादी काँग्रेसच्या जागा वाटपामध्ये अकोला पश्चिम व बाळापूर विधानसभा मतदारसंघाचा गुंता सोमवारी मुंबईत झालेल्या बैठकीतीही सुटला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मुस्लीमबहुल मतदार असलेल्या या मतदारसंघावर राष्टÑवादी काँग्रेसने दावा केल्यामुळे काँग्रेसच्या इच्छुकांनी श्रेष्ठींकडे हा मतदारसंघ कायम ठेवण्याचा रेटा लावला होता. त्यानुसार हा मतदारसंघ काँग्रेसला देण्यात आल्याचे संकेत श्रेष्ठींनी इच्छुक उमेदवारांना दिल्यामुळे त्यांच्यात उत्साह संचारला होता; मात्र दुपारी आघाडीची जागा वाटपासंदर्भात चर्चा झाल्यानंतर अकोला पश्चिम संदर्भात कुठलाही निर्णय घेण्यात आला नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांच्या इच्छुकांचा जीव पुन्हा एकदा टांगणीला लागला आहे. आता या मतदारसंघाबाबत पुन्हा चर्चा होणे अपेक्षित आहे. हा मतदारसंघ काँग्रेसला मिळाल्यास तेथील उमेदवार कोण, हे ठरल्यानंतर त्यानुसार सामाजिक समीकरणे मांडून इतर मतदारसंघातील उमेदवारांची निवड होणार आहे. अकोला पश्चिम व बाळापूर या दोन मतदारसंघातून काँग्रेस आघाडीच्या वतीने मुस्लीम उमेदवार दिला जाण्याचे संकेत आहेत. त्यामुळे हा उमेदवार कोणत्या मतदारसंघासाठी असेल, यावरून इतर मतदारसंघातील इच्छुकांना संधीची शक्यता आहे. दुसरीकडे पश्चिम सोडल्यास बाळापूर राष्टÑवादीला द्यावा, हा राष्ट्रवादीचा आग्रह राहणार आहे, त्यामुळे या दोन्ही मतदारसंघाबाबतचे निर्णय आता अंतिम टप्प्यातच होण्याची चिन्हे असल्याचीही माहिती सूत्रांनी दिली आहे.
शिवसेनेला मिळणाऱ्या आठ जागांमध्ये बाळापूरची चर्चा!
भाजप-शिवसेनेची युती निश्चित मानली जात असून, विदर्भात आठ जागा सेनेला मिळणार असल्याची चर्चा आहे. यामध्ये अकोल्यातील बाळापूरचा समावेश असल्याची माहिती आहे. बाळापूर व्यतिरिक्त सेनेला आणखी एकही मतदारसंघ मिळणार नसल्याचे स्पष्ट होत आहे. अकोट, मूर्तिजापूर या दोन मतदारसंघात सेनेने विद्यमान आमदारांच्या विरोधात उघड भूमिका घेतली होती. आता युतीमध्ये भाजपासोबत येथील नेत्यांना काम करावे लागणार असल्याने सेनेच्या इच्छुकांची प्रचंड कोंडी होणार असून, बंडखोरीची शक्यता व्यक्त होत आहे. दुसरीकडे सेनेला एक शहरी मतदारसंघ देण्यात यावा या मागणीलाही युतीमध्ये हरताळ फासण्यात येणार असल्याने सेनेला केवळ एका जागेवरच समाधान मानावे लागणार आहे.