vidhan sabha 2019 : दावा शिवसंग्रामचा; ए व बी फॉर्म शिवसेनेला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2019 10:57 AM2019-10-01T10:57:48+5:302019-10-01T10:58:00+5:30
बाळापुरात शिवसंग्रामचे उपाध्यक्ष संदीप पाटील तर रिसोडमध्ये विष्णुपंत भुतेकर व प्रमोद गोळे हे प्रबळ दावेदार आहेत.
- राजेश शेगोकार
अकोला: शिवसंग्रामने महायुतीमध्ये अकोल्यातील बाळापूर व वाशिममधील रिसोड या मतदारसंघावर दावा करून तशी मोर्चेबांधणीही केली; मात्र या दोन्ही जागांवर शिवसेनेने आपल्या उमेदवारांना ए, बी फॉर्मचे वाटप केल्यामुळे शिवसंग्रामची विदर्भात कोरी पाटी राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, याबाबत शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी मात्र आम्ही आशावादी आहोत, अशी प्रतिक्रिया दिल्यामुळे शिवसंग्रामला संधी मिळणार तरी कुठे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
विदर्भात शिवसंग्रामची मोर्चेबांधणी करण्यासाठी मेटे यांनी महिनाभरात लागोपाठ दोन वेळा बाळापूर व रिसोड मतदारसंघाचा दौरा करून कार्यकर्त्यांना या दोन्ही जागा आपल्याच, असा विश्वास दिला होता. त्यामुळे शिवसंग्रामने या मतदारसंघात तयारीही सुरू केली. बाळापुरात शिवसंग्रामचे उपाध्यक्ष संदीप पाटील तर रिसोडमध्ये विष्णुपंत भुतेकर व प्रमोद गोळे हे प्रबळ दावेदार आहेत. या दोन्ही जागांवर शिवसेनेने अनुक्रमे नितीन देशमुख व विश्वनाथ सानप यांना एबी फॉर्म दिल्यामुळे या जागांचा गुंता निर्माण झाला आहे. युतीची अधिकृत घोषणा नसताना सेनेने दिलेल्या या ए, बी फॉर्ममुळे युतीमध्ये या दोन्ही जागा सेनेलाच सुटल्याचा दावा शिवसेनेकडून केला जात आहे.
शिवसेनेने रविवारी संध्याकाळी त्यांच्या उमेदवारांना एबी फॉर्म दिले असले तरी युतीची घोषणा बाकी आहे. मुख्यमंत्र्यांशी आमचे बोलणे सुरू असून, संध्याकाळी त्यांच्यासोबत बैठक झाल्यानंतरच चित्र स्पष्ट होईल. आम्ही मागितलेल्या मतदारसंघाबाबत आशावादी आहोत.
विनायक मेटे
अध्यक्ष, शिवसंग्राम