vidhan sabha 2019 : सिरस्कारांना डच्चू; भदे, पुंडकर, पुंजानी यांना उमेदवारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2019 10:50 AM2019-10-01T10:50:01+5:302019-10-01T10:50:08+5:30
भारिप-बमसंचे एकमेव आमदार असलेल्या बळीराम सिरस्कारांना बाळापूरची उमेदवारी नाकारून अॅड. आंबेडकरांनी पुन्हा एकदा धक्कातंत्र अवलंबले आहे.
अकोला: काँग्रेस-राष्टÑवादी काँग्रेस आघाडीसह, युती आणि वंचित बहुजन आघाडीमध्येही उमेदवारी वाटपात मोठी उलथापालथ होणार असल्याचे संकेत होते. त्याची सुरुवात वंचित बहुजन आघाडीने केली आहे. भारिप-बमसंचे एकमेव आमदार असलेल्या बळीराम सिरस्कारांना बाळापूरची उमेदवारी नाकारून अॅड. आंबेडकरांनी पुन्हा एकदा धक्कातंत्र अवलंबले आहे. तर अकोला पूर्वचे प्रतिनिधित्व केलेल्या हरिदास भदे यांना पुन्हा संधी देण्यात आली असून, बाळापुरात डॉ. धैर्यवर्धन पुंडकर, अकोला पश्चिममध्ये इम्रान पुंजानी यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे.
अकोल्यातील पाच मतदारसंघांपैकी तीन मतदारसंघामध्ये उमेदवार घोषित करतानाच उमेदवारांची सर्वाधिक भाऊगर्दी असलेल्या अकोट व मूर्तिजापूर या मतदारसंघातील उमेदवारांना अॅड. आंबेडकरांनी प्रतीक्षेतच ठेवले आहे. गेल्या दहा वर्षांपासून बाळापूर विधानसभा मतदारसंघ हा भारिप-बहुजन महासंघाचा गड बनला आहे. बळीराम सिरस्कार यांनी सलग दोन वेळा विजय मिळवला. यावेळीही ते तयारीत होते; मात्र सामाजिक समीकरणे आणि या टर्ममधील त्यांच्या कामगिरीबाबत असलेल्या नाराजीमुळे त्यांची उमेदवारी धोक्यात येऊ शकते, असे संकेत होते ते प्रत्यक्षात उतरले आहेत. सिरस्कारांना थांबा देत वंचित बहुजन आघाडीने पक्षाचे प्रवक्ते डॉ. धैर्यवर्धन पुंडकर यांना संधी दिली आहे. पुंडकर यांना यापूर्वी २००९ च्या निवडणुकीत भारिप-बमसंचा एबी फॉर्म देण्यात आला होता; मात्र पक्षाने ऐनवेळी तो मागे घेऊन सिरस्कारांना संधी दिली होती. तेव्हाही पुंडकर यांनी माघार घेत पक्षाचे काम सुरू ठेवले. त्यामुळे गेल्या दहा वर्षातील पक्षनिष्ठेचे त्यांना फळ मिळाल्याची चर्चा वंचितच्या पदाधिकाऱ्यांमध्ये सुरू होती.
अकोला पूर्व मतदारसंघाच्या निर्मितीनंतर २००९ मध्ये भारिप-बमंसचे हरिदास भदे यांनी विजय मिळविला होता; मात्र २०१४ मध्ये त्यांना हा मतदारसंघ भारिपकडे कायम ठेवता आला नाही. २०१४ च्या मोदी लाटेतही त्यांनी निकराची झुंज दिली; मात्र अवघ्या २ हजार ४०० मतांनी त्यांचा पराभव झाला. या पराभवानंतर भारिप-बमसमध्ये सक्रिय राहतानाच भदे यांनी भारिप ते वंचित बहुजन आघाडीच्या निर्मितीच्या प्रवासात अॅड. आंबेडकरांना समर्थ साथ दिल्यामुळेच त्यांना पुन्हा एकदा संधी मिळाली असल्याचे समजते. अकोला पश्चिम या मुस्लीमबहुल मतदारसंघात वंचितने इमरान पुजांनी यांना उमदेवारी देऊन दलित-मुस्लीम मतांची मोट बांधण्यासाठी पाऊल उचलले असल्याचे मानले जाते.
काँग्रेस आघाडी नव्याने मांडणार गणिते
वंचितच्या उमेदवारांमुळे आता काँग्रेस आघाडीचे उमेदवार ठरविताना आघाडीला नव्याने गणिते मांडावी लागतील. मुस्लीमबहुल अकोला पश्चिममध्ये वंचितने मुस्लीम उमेदवार दिल्यामुळे काँग्रेसच्या मतपेढीलाच धक्का लागणार असल्याने येथे आघाडी कोणती रणनीती आखते, ते औत्सुक्याचे आहे. विशेष म्हणजे हा मतदारसंघ कोणाला, याचे त्रांगडे आघाडीत अजूनही कायम असल्यानेच काँग्रेसच्या इच्छुकांनी दिल्ली दरबाराकडून आशा सोडलेली नाही.
.
अकोट, मूर्तिजापुरात धक्कातंत्राची धास्ती
अकोट आणी मूर्तिजापूर या दोन मतदारसंघात वंचितकडून उमेदवारीसाठी इच्छुकांची मोठी गर्दी आहे. त्यामुळे येथे उमेदवारी ठरविताना बाळापूरसारख्याच धक्कातंत्राची धास्ती इच्छुकांना बसली आहे. अकोटमधील सामाजिक समीकरणे व मूर्तिजापुरात भाजप, राष्टÑवादीचे आव्हान लक्षात घेता चर्चेत नसलेल्या एखाद्या उमेदवाराची वर्णीही लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सिरस्कार म्हणतात अर्ज दाखल करणार पण...!
बाळापुरातून उमेदवारी नाकारलेले आमदार बळीराम सिरस्कार हे १ सप्टेंबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती आहे. याबाबत त्यांच्याशी संपर्क साधला असता अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया तयार करून ठेवली होती. त्यामुळे मंगळवारी अर्ज दाखल करत आहोत. पक्षाने घेतलेल्या निर्णयाचे स्वागतच असून, पक्षादेशाचे पालन करणार असे ते ‘लोकमत’ शी बोलताना म्हणाले.