vidhan sabha 2019 : सोशल मीडियावर चढला राजकीय रंग!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 06:29 PM2019-09-23T18:29:01+5:302019-09-23T18:29:26+5:30
राजकीय नेत्यांना ट्रोल करण्यासोबतच काही मुद्यांना भावनिकतेची जोड देत मतदारांचे मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्नही सोशल मीडियाच्या माध्यमातून सुरू आहे.
अकोला: विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने सध्या सोशल मीडियावर राजकीय रंग चढला आहे. विविध राजकीय मुद्यांना भावनिकतेची जोड देण्याचा प्रयत्नही या माध्यमातून होत आहे. त्याचा तरुणाईच्या मनावर काय परिणाम होतो, हे निवडणुकीच्या निकालानंतरच दिसेल; पण सध्या तरी या राजकीय मुद्यांवर सोशल मीडियावर चांगलेच घमासान रंगले आहे.
देशात सध्या आर्थिक मंंदी अन् बेरोजगारीचा मुद्दा गंभीर झाला आहे. त्यात विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजल्याने स्थानिक मतदारसंघाच्या विकासाचाही मुद्दा मतदारांमध्ये चर्चेचा विषय होत आहे. गावकट्टा ते सोशल मीडियावर या चर्चेला उधाण आले असून, विविध राजकीय नेत्यांना नेटकरी चांगलेच ट्रोल करत आहेत. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय नेत्यांची आश्वासने अन् स्थानिक विकास कामांची वास्तविकता यावरून सत्ता पक्षांसोबतच विरोधी पक्षाच्या उमेदवारांचीही व्हाट्स अॅप, फेसबुक, ट्युटरसारख्या सोशल माध्यमांवर नेटकऱ्यांकडून चांगलीच कानउघाडणी सुरू झाली आहे. यासोबतच यंदाच्या निवडणुकीत उमेदवाराला कोणत्या कामासाठी मतदान कराल, असाही सवाल नेटकऱ्यांकडून विचारल्या जात आहे. विविध मुद्यांवर राजकीय नेत्यांना ट्रोल करण्यासोबतच काही मुद्यांना भावनिकतेची जोड देत मतदारांचे मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्नही सोशल मीडियाच्या माध्यमातून सुरू आहे.