vidhan sabha 2019 : चार मतदारसंघांत सात उमेदवारांचे नऊ अर्ज दाखल!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2019 02:45 PM2019-10-02T14:45:03+5:302019-10-02T14:45:17+5:30
अकोट, बाळापूर, अकोला पश्चिम व अकोला पूर्व या चार विधानसभा मतदारसंघांत सात उमेदवारांचे नऊ उमेदवारी अर्ज दाखल झाले.
अकोला : जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तिसऱ्या दिवशी १ आॅक्टोबर रोजी अकोट, बाळापूर, अकोला पश्चिम व अकोला पूर्व या चार विधानसभा मतदारसंघांत सात उमेदवारांचे नऊ उमेदवारी अर्ज दाखल झाले. मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघात एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही.
जिल्ह्यातील अकोट, बाळापूर, अकोला पश्चिम, अकोला पूर्व व मूर्तिजापूर या पाच विधानसभा मतदारसंघांच्या निवडणुकीसाठी २१ आॅक्टोबर रोजी मतदान घेण्यात येणार आहे. त्यासाठी उमेदवारी अर्जांचे वाटप व उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया २७ सप्टेंबरपासून सुरू झाली. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी (शुक्रवारी) बाळापूर विधानसभा मतदारसंघातून एक उमेदवारी अर्ज दाखल झाला होता. गत २८ व २९ सप्टेंबर रोजी दोन दिवसांच्या शासकीय सुटीनंतर उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दुसºया दिवशी (३० सप्टेंबर रोजी) जिल्ह्यातील एकाही विधानसभा मतदारसंघात एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. त्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तिसºया दिवशी (१ आॅक्टोबर रोजी) अकोट, बाळापूर, अकोला पश्चिम व अकोला पूर्व या चार विधानसभा मतदारसंघांत सात उमेदवारांनी नऊ उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यामध्ये अकोट मतदारसंघात अपक्ष मधुसुदन गणगणे, विठ्ठल कोगदे, बाळापूर मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचे आमदार बळीराम सिरस्कार, अपक्ष अश्वजित शिरसाट, तस्लीम शेख करीम शेख, अकोला पश्चिम मतदारसंघात अपक्ष रवींद्र मुंढे व अकोला पूर्व मतदारसंघात अपक्ष महेंद्र भोजने इत्यादी सात उमेदवारांचे नऊ उमेदवारी अर्ज दाखल झाले असून, मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघातून एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ४ आॅक्टोबर असून, सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील.