vidhan sabha 2019 : युतीमध्ये शिवसेनेला अकोल्यातील एकच मतदारसंघ मिळण्याची शक्यता!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 12:07 PM2019-09-23T12:07:40+5:302019-09-23T12:07:46+5:30
आता या चार मतदारसंघांव्यतिरिक्त उरलेला एकमेव बाळापूर हाच मतदारसंघ सेनेला देण्याची शक्यता आहे.
- राजेश शेगोकार
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: विधानसभा निवडणुकीसाठीच्या मोर्चेबांधणीचे राजकारण आता वेगाने फिरू लागले आहे. भाजप-सेना युतीची बोलणी अंतिम टप्प्यात असून, युतीमध्ये सेनेला अकोल्यातील एकच मतदारसंघ मिळणार असल्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. सोमवारी मुंबईत भाजप पार्लमेंटरी बोर्डची बैठक होत आहे. या बैठकीत सेनेला कोणते मतदारसंघ सोडणार, याची चर्चा अपेक्षित असल्याने सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुंबईत धाव घेतली आहे.
२०१४ च्या मोदी लाटेत भाजपाने अकोल्यात चार मतदारसंघ जिंकून सेनेला मागे टाकले. त्यामुळे आता या चार मतदारसंघांव्यतिरिक्त उरलेला एकमेव बाळापूर हाच मतदारसंघ सेनेला देण्याची शक्यता आहे. सेनेचा दोन मतदारसंघांवर दावा असून, मूर्तिजापूर मतदारसंघात सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी भाजप आमदार हरीश पिंपळे यांच्याविरोधात बैठकांचे सत्र सुरू केले आहे. भाजपाचे पिंपळे पुन्हा आमदार नको, असा शिवसैनिकांचा आग्रह असल्याने या मतदारसंघाबाबतही युतीमध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपच्या पार्लमेंटरी बोर्डच्या बैठकीत जागा वाटपाबाबत काय धोरण ठरते, याकडे भाजपसह शिवसैनिकांचेही लक्ष लागलेले आहे.
दुसरीकडे याच मतदारसंघावर शिवसंग्रामचाही दावा कायम असल्याने भाजपसमोर हा मतदारसंघ कोणाला सोडावा, याचा मोठा प्रश्न राहणार आहे. युतीमध्ये मित्रपक्षांना अठराऐवजी दहा मतदारसंघ देण्याबाबत चर्चा सुरू असल्याने मित्रपक्षांच्या कमी झालेल्या मतदारसंघात पुन्हा बाळापूरचा बळी जातो का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
काँग्रेस-राष्ट्रवादीची आज पुन्हा बैठक; अकोला पश्चिम, बाळापूरवर चर्चा अपेक्षीत
काँग्रेस-राष्टÑवादी काँग्रेसच्या जागा वाटपामध्ये अकोला पश्चिम व बाळापूर विधानसभा मतदारसंघाचा गुंता सोमवारी होणाºया बैठकीत सुटण्याची चिन्हे आहेत. राष्टÑवादी काँग्रेसने या मतदारसंघावर दावा केल्यामुळे हा मतदारसंघ त्यांना देण्यात आला होता; मात्र काँग्रेसच्या इच्छुकांनी श्रेष्ठींकडे हा मतदारसंघ कायम ठेवण्याचा रेटा लावल्याने या मतदारसंघाबाबत सोमवारी पुन्हा चर्चा होणे अपेक्षित आहे. हा मतदारसंघ काँग्रेसला मिळाल्यास पुन्हा उमेदवारीसाठी स्पर्धा रंगणार असून, नाराजांच्या बंडखोरीचेही आव्हान पक्षासमोर कायम राहणार असल्याचे संकेत आहेत. दुसरीकडे अकोला पश्चिमवरील दावा सोडताना राष्टÑवादी काँग्रेस बाळापूरबाबत आग्रही राहण्याची शक्यता असल्याचीही माहिती सूत्रांनी दिली आहे.