विदर्भात समूहाने तुती लागवडीवर भर
By admin | Published: August 13, 2015 10:36 PM2015-08-13T22:36:52+5:302015-08-13T22:36:52+5:30
अमरावती विभागाला बाराशे हेक्टरचे उद्दिष्ट.
अकोला - तुती लागवड आणि त्या माध्यमातून रेशीम उद्योग उभारणीवर रेशमी संचालनालयाने भर दिला असून, त्यासाठी राज्यात समूहाने तुतीची लागवड केली जाणार आहे. यासाठी विदर्भाकडेही लक्ष केंद्रित करण्यात आले असून, अमरावती विभागाला या लागवडीकरिता १२00 हेक्टरचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. तुती लागवडीतून शेतकर्यांना चांगला फायदा होत आहे. तुतीच्या माध्यमातून रेशीम उद्योगाला चालना मिळत आहे. म्हणूनच राज्यात तुतीच्या क्षेत्रात वाढ होत असून, यासाठी शेतकरी बचत गट पुढे येत आहेत. पाणीटंचाईच्या संकटात तुती लागवड सोयीस्कर असल्याने शेतकर्यांचा कल तुती लागवडीकडे आहे. या हंगामात राज्यात जवळपास ६0 हजार हेक्टरपर्यंत तुतीची लागवड करण्याचे उद्दिष्ट आहे. यामध्ये विदर्भातील आठ जिल्ह्यांमध्ये ४८0 हेक्टर क्षेत्रावर तुतीची लागवड करण्यात आली आहे. अमरावती विभागाला १२00 हेक्टरचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. अकोला जिल्ह्यात ७७ हेक्टर, वाशिम १0६, बुलडाणा ४६ हेक्टर, यवतमाळ ९६ हेक्टर व अमरावती जिल्ह्यात ४0 हेक्टरवर तुती लागवड करण्यात आली आहे. यंदा रेशीम विकास अधिकार्यांनी तुती लागवड करण्यासाठी आवाहन केले आहे; पण रेशीम संचालनालयाने यापुढे तुतीची लागवड समुहाने करण्यावर भर दिला आहे. एका शेतकर्याने तुती लागवड केल्यास त्या शेतकर्याला लागवडीची तांत्रिक माहिती देण्यास अडचण निर्माण होत असल्याने समूहाने लागवड करण्यावर यंदा भर दिला जात आहे. अकोला जिल्ह्यात पाचही तालुक्यात तुती लागवडीसाठी शेतकर्यांचे समूह (कल्स्टर) करण्यात आले आहेत, यात तेल्हारा, आकोट, मूर्तिजापूर, बाळापूर व उर्वरित तीन तालुक्यांचे स्वतंत्र गट तयार करण्यात आले आहेत.
अकोला जिल्ह्यात रेशीम उद्योग व्यवसायाला चालना देण्यासाठी महिला बचत गटाद्वारे रेशीम काढण्यासाठीचे उद्योग सुरू करण्यात आले आहे. राज्यात यंदा समूहाने तुती लागवड क्षेत्र वाढीवर भर देण्यात आला आहे. तुती लागवड करणार्या शेतकर्यांना तांत्रिक मार्गदर्शन मिळावे, हा उद्देश या मागे आहे. जिल्ह्यात २४0 हेक्टरचे उद्दिष्ट आहे. आतापर्यंत ७७ हेक्टरवर तुती लागवड करण्यात आली असल्याचे जिल्हा रेशीम विकास अधिकारी एस.पी. फडके यांनी सांगीतले.