अकोल्याच्या महापौरपदी भाजपचे विजय अग्रवाल
By admin | Published: March 10, 2017 02:42 AM2017-03-10T02:42:34+5:302017-03-10T02:42:34+5:30
उपमहापौरपदी वैशाली शेळके, काँग्रेसचा पराभव.
अकोला, दि. ९- अकोला महानगरपालीकेच्या महापौरपदी भारतीय जनता पक्षाचे विजय अग्रवाल तर उपमहापौरपदी वैशाली शेळके यांची निवड झाली. भाजप उमेदवारांनी कॉग्रेसच्या उमेदवारांचा पराभव केला. मनपाची स्थापना झाल्यापासून १६ वर्षांच्या कालावधीनंतर प्रथमच भाजपला एकहाती सत्ता मिळाली आहे.
गुरुवारी मनपाच्या मुख्य सभागृहात महापौर व उपमहापौर पदाची निवडणूक प्रक्रिया पार पडली. भाजपचे विजय अग्रवाल यांना ८0 नगरसेवकांपैकी भाजपच्या ४९ नगरसेवकांची मते मिळाली. क ाँग्रेसचे उमेदवार शेख मोहम्मद नौशाद यांना काँग्रेसच्या १३ नगरसेवकांसह भारिप-बमसंच्या तीन व एक अपक्ष अशी एकूण १७ मते मिळाली. उपमहापौर पदासाठी भाजपच्या वैशाली विलास शेळके यांना ४९ मते मिळाली. काँग्रेसच्या सुवर्णरेखा जाधव यांना १७ मते प्राप्त झाली. या निवडणुकीत शिवसेनेच्या आठ नगरसेवकांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे पाच व एमआयएमच्या एका नगरसेवकाने तटस्थ राहणे पसंत केले. उपमहापौर पदासाठी शिवसेनेच्यावतीने दोन उमेदवारी अर्ज सादर करण्यात आले होते. ऐनवेळी सेनेच्या दोन्ही उमेदवारांनी निवडणूक प्रक्रियेतून माघार घेतली. महापौर, उपमहापौर पदाची निवड प्रक्रिया दुपारी १२ वाजता आटोपल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी फटाके फोडून ढोल-ताशांच्या गजरात आनंद साजरा केला. दुपारी ४ वाजेपर्यंत पालिकेच्या आवारात जल्लोष सुरू होता.
महापालिकेत 'विजय'पर्व
राजकीय सारिपाटावर विजय अग्रवाल यांच्याकडे विविधांगी नजरेतून पाहिल्या जाते. १९८0 पासून पक्षात सक्रिय असलेल्या अग्रवाल यांनी आजवर अनेकांना आश्चर्याचे धक्के दिले. प्रशासनाचा गाढा अभ्यास व सर्वांना सोबत घेऊन चालणे ही त्यांची जमेची बाजू आहे. महापौर पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर महापालिकेत नवीन ह्यविजयह्णपर्वाला सुरुवात झाली आहे. अकोलेकरांनी भाजपला दिलेले स्पष्ट बहुमत पाहता विजय अग्रवाल व त्यांच्या सहकारी नगरसेवकांवर निश्चितच मोठी जबाबदारी आली आहे, हे येथे उल्लेखनीय.
भाजपचे शक्तिप्रदर्शन
निवडणुकीचा निकाल घोषित झाला त्याच दिवशी महापालिकेच्या सत्तेची चावी भाजपच्या हातामध्ये गेल्याचे स्पष्ट झाले होते. ८0 जागांपैकी ४८ जागांवर भाजपने विजय मिळवल्याने महापौर, उपमहापौर पदाच्या निवडणुकीची केवळ औपचारिकता बाकी होती. महापौर, उपमहापौर पदाची निवड प्रक्रिया दुपारी १२ वाजता आटोपल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी सभागृह दणाणून सोडले. फटाक्यांची आतषबाजी तसेच ढोल-ताशांच्या गजरात आनंद साजरा केला. सायंकाळी ५ वाजेपर्यंत पालिकेच्या आवारात जल्लोष सुरू होता. यावेळी भाजपचे खासदार, आमदार, पदाधिकारी, मंडळ अध्यक्षांसह कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.