मुरंबा येथे विजय भटकरांचा गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2017 02:04 AM2017-10-12T02:04:49+5:302017-10-12T02:05:08+5:30
३00 विद्यार्थ्यांचा सहभाग मूर्तिजापूर : मुरंबासारख्या खेडेगावात जन्म घेऊन संपूर्ण जगामध्ये संगणक क्षेत्रात मोलाचे योगदान देणारे पद्मभूषण डॉ. विजय भटकर यांच्या जन्मगावी दोन वर्षांपासून ग्रामीण भागाच्या विकासासाठी शोध विज्ञान तंत्रज्ञान विषयावर विविध स्पर्धा आयोजित केले जाते.
मूर्तिजापूर : मुरंबासारख्या खेडेगावात जन्म घेऊन संपूर्ण जगामध्ये संगणक क्षेत्रात मोलाचे योगदान देणारे पद्मभूषण डॉ. विजय भटकर यांच्या जन्मगावी दोन वर्षांपासून ग्रामीण भागाच्या विकासासाठी शोध विज्ञान तंत्रज्ञान विषयावर विविध स्पर्धा आयोजित केले जाते. दयार्पूर येथील गाडगेबाबा मंडळाच्यावतीने विजय भटकर यांच्या वाढदिवशी राष्ट्रीय विज्ञान स्पर्धेचे आयोजन, भटकर यांचा गौरव सोहळा व त्यांनी लिहिलेल्या संत गाडगेबाबा या इंग्रजी व मराठी भाषेत अनुवादित ग्रंथांचा लोकार्पण सोहळा आदी विविध कार्यक्रम ११ ऑक्टोबर रोजी थाटात पार पडले.
मुलांमध्ये विज्ञान तंत्रज्ञान रुजावे, नवनवीन प्रयोग संशोधनाची विद्यार्थ्यांना माहिती मिळावी, या दृष्टींने ११ ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय विज्ञान स्पर्धा घेण्यात आली. त्यात देशभरातील ३00 महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी भाग घेतला. तसेच या निमित्ताने भरवण्यात आलेल्या विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांना अनेक प्रयोग बघायला मिळाले
या सोहळ्याला जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, हर्षवर्धन देशमुख, डॉ. आर.जे. राठोड, नितीन धांडे, दिलीप इंगोले, डॉ. अजय देशमुख, भागवत सैदाने, राहुल तायडे, चंदन राठोड, केशवराव मेतकर, नानासाहेब देशमुख यांची उपस्थिती होती. तसेच संत गाडगेबाबा यांच्या इंग्रजी व मराठीमध्ये अनुवाद केलेल्या ग्रंथाचा लोकार्पण सोहळा यावेळी पार पडला. अध्यात्म आणि विज्ञान यांची सांगड घालत जगावेगळे कर्तृत्व सिद्ध करणार्या डॉ. विजय भटकर यांनी विदर्भातील कौंडीण्यपूर येथे पंचकन्या विद्यापीठ नावाने देशातील सर्वात चांगले मुलींचे विद्यापीठ स्थापन करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे मत व्यक्त केले.
यावेळी डॉ. विजय भटकर यांचे आत्मचरित्र लिहिण्याची व प्रकाशन करण्यासाठी समिती गठित करण्यात आली. या समितीचे अध्यक्ष गजानन भारसाकळे व सदस्य रवींद्र खोटरे, प्रा. गजानन पदमने, मंदार देशमुख व शेखर पाटील यांचा समावेश असून, पुढील वर्षी आंतरराष्ट्रीय कार्यक्रमामध्ये सदर आत्मचरित्र प्रकाशित करण्याचा मानस आहे. विदर्भस्तरीय स्पर्धेपासून ते राष्ट्रीय स्पर्धेच्या आयोजनाकरिता भरीव सहकार्य करणार्या मान्यवरांचा सत्कार यावेळी डॉ. विजय भटकर यांचे हस्ते करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी रत्नमाला दूरशिक्षण संस्थेचे अमित भिमटे व दयाल यांच्यासह आय.ए.एस. अँकॅडमीच्या विद्यार्थांचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे संचालन डॉ. माने यांनी केले.