गावपातळीवर नळ जोडणी कृती आराखडा तयार होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:12 AM2021-07-23T04:12:57+5:302021-07-23T04:12:57+5:30
अकोला : ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबापर्यंत कार्यान्वित नळ जोडणीद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी जलजीवन मिशन अंतर्गत २२ जुलै ते ७ ऑगस्ट ...
अकोला : ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबापर्यंत कार्यान्वित नळ जोडणीद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी जलजीवन मिशन अंतर्गत २२ जुलै ते ७ ऑगस्ट २०२१ दरम्यान गाव कृती आराखडा पंधरवडा अभियान राबविण्यात येणार आहे. यामध्ये गावपातळीवर नळ जोडणीचा गाव कृती आराखडा तयार करण्यात येईल. या पंधरवडा अभियानात जिल्हा, तालुका व गाव पातळीवर सर्वांनी सहभाग घेऊन पंधरवडा अभियान यशस्वीरीत्या राबविण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार यांनी केले आहे. २२ जुलै रोजी जलजीवन मिशन राज्य पाणी व स्वच्छता विभागाच्या वतीने आगरकर विद्यालय परिसरातील जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षामध्ये दुपारी २.३० ते ५.०० या दरम्यान ग्रामीण पाणीपुरवठ्याचे कार्यकारी अभियंता, उपअभियंता, शाखा अभियंता, डाटा एंट्री ऑपरेटर तसेच जिल्हा कक्षाच्या सनियंत्रण मूल्यमापन सल्लागार यांना झूम ॲपद्वारे गाव कृती आराखड्याबाबत प्रशिक्षण देण्यात येईल. यामध्ये गाव कृती आराखड्यामधील माहितीचे संकलन, राबविण्याच्या प्रक्रिया, कोबो टूलद्वारे माहिती अपलोड बाबत प्रशिक्षण देण्यात येणार आहे.