गावनिहाय ‘वॉटर ऑडिट’
By admin | Published: March 11, 2015 01:35 AM2015-03-11T01:35:46+5:302015-03-11T01:35:46+5:30
जिल्हा प्रशासनामार्फत गावनिहाय पाण्याचा ताळेबंद.
संतोष येलकर / अकोला: जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जिल्ह्यात निवड करण्यात आलेल्या २00 गावांमध्ये गावनिहाय लोकसंख्या, पाण्याची आवश्यकता, गाव शिवारातून वाहून जाणारे पावसाचे पाणी याबाबत सर्वंकष माहिती घेऊन, गावनिहाय पाण्याचा ताळेबंद (वॉटर ऑडिट) जिल्हा प्रशासनामार्फत फेब्रुवारीअखेर करण्यात आला.
राज्यात वारंवार उद्भवणार्या टंचाई परिस्थितीवर मात करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याकरिता शासनामार्फत जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील सातही तालुक्यात २00 गावांची निवड करण्यात आली.
या गावांमध्ये जलसंधारणाची कामे करण्यात येणार आहेत. त्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत निवड करण्यात आलेल्या गाव शिवारात पडणारा पाऊस, गावाची लोकसंख्या, पिण्याचे पाणी व संरक्षित ओलितासाठी लागणारे पाणी, गाव शिवारातून वाहून जाणारे पावसाचे पाणी आणि पाणी अडविणे व जिरविण्यासंदर्भात करावयाच्या उपाययोजना यासंदर्भात कृषी विभागामार्फत गावनिहाय माहिती घेण्यात आली.
या माहितीच्या आधारे गावनिहाय पाण्याचा ताळेबंद (वॉटर ऑडिट) करण्यात आला. या ताळेबंदानुसार जिल्ह्यातील २00 गावांमध्ये जलसंधारणाच्या कामांचे आराखडे संबंधित यंत्रणांकडून तयार करण्यात येत आहेत.