पोलीस पाटील कुटुंबीयांवर ग्रामस्थांचा बहिष्कार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:19 AM2021-05-21T04:19:30+5:302021-05-21T04:19:30+5:30

तालुक्यातील स्वातंत्र्यानंतरही विकासापासून कोसो दूर असलेल्या दुर्गम आदिवासी पाड्यातील गावकऱ्यांनी मोजक्या समाजधुरिणांच्या दबावाखाली येऊन पोलीस पाटील व त्यांच्या कुटुंबावर ...

Villagers boycott police Patil family! | पोलीस पाटील कुटुंबीयांवर ग्रामस्थांचा बहिष्कार!

पोलीस पाटील कुटुंबीयांवर ग्रामस्थांचा बहिष्कार!

Next

तालुक्यातील स्वातंत्र्यानंतरही विकासापासून कोसो दूर असलेल्या दुर्गम आदिवासी पाड्यातील गावकऱ्यांनी मोजक्या समाजधुरिणांच्या दबावाखाली येऊन पोलीस पाटील व त्यांच्या कुटुंबावर बहिष्कार घातला. किराणा, दळण, पाणी पूर्णतः बंद केले. बहिष्कृत पोलीस पाटलाच्या कुटुंबाशी कोणी बोलल्यास दहा रुपये दंड करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सोनुना गावच्या ३० वर्षांपासून पोलीस पाटील पदावर कार्यरत असलेल्या रमेश नारायण कदम यांच्यासह त्यांच्या परिवारातील त्यांच्या पत्नी शशिकला रमेश कदम, आई गंगूबाई कदम, मुलगी गोकुळा कदम, रिना रमेश कदम आणि मुलगा प्रमोद कदम या सर्वांवर गावातील काही समाजधुरिणांच्या दबावाखाली येऊन गावकऱ्यांनी बहिष्कार टाकला आहे. त्यामुळे कदम कुटुंब व्यथित झाले आहे. गत पंधरा दिवसांपासून गावातील कुणीही पोलीस पाटलांच्या परिवाराशी बोलत नाही. त्याबरोबरच गावातील सार्वजनिक स्थळावरून पिण्याचे पाणी भरू दिले जात नाही. गावातील दुकानदार किराणा देत नाही. पीठ गिरणीतून दळण दळून मिळत नाही. गावातील कोणी व्यक्ती पोलीस पाटलाच्या कुटुंबासोबत बोलल्यास दहा रुपये दंड सुनावण्यात येईल, असा गंभीर प्रकार कदम कुटुंबीयांसोबत घडत आहे.

पोलिसांकडे तीनवेळा तक्रार देऊनही दुर्लक्ष

गावातील काही समाजधुरिणांच्या सांगण्यानुसार ग्रामस्थांनी कदम कुटुंबीयांवर बहिष्कार घातला. याबाबत पोलीस पाटील रमेश कदम यांनी चान्नी पोलीस ठाण्यात तीन वेळा तक्रार केली. परंतु, पोलिसांनी त्यांच्या तक्रारीची दखल घेतली नाही. त्यामुळे व्यथित झालेल्या कदम कुटुंबीयाने न्याय मागावा तरी कुणाला? असा प्रश्न उपस्थित होत आहे. कायद्याचे रक्षकच जर समाजधुरिणांच्या हातचे बाहुले बनत असतील, तर शोषित, पीडितांनी कुणाकडे जावे.

काय आहे वादाचे कारण?

पोलीस पाटील रमेश कदम यांच्या शेतात सामाजिक सभागृह बांधून त्याला मंदिराचे स्वरूप देण्याचा निर्णय सत्ताधारी राजकीय पक्षाच्या गावातील पुढारी म्हणून मिरविणाऱ्या चारजणांनी घेतला. यावेळी कदम यांनी शेतात बांधकाम करण्यापूर्वी माझी परवानगी का घेतली नाही, असे त्यांना विचारल्यावर, त्यांनी कदम परिवाराला शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. एवढेच नाही तर त्यांनी या द्वेषातून कदम कुटुंबावर बहिष्कार घालण्यास ग्रामस्थांना बाध्य केले.

दोन महिन्यांपासून त्रास

पोलीस प्रशासनाचा गाव पातळीवर दुवा म्हणून पोलीस पाटील काम करतात. मात्र, पोलीस पाटलाला न्याय मिळत नसल्यामुळे त्यांनी पातूर तहसील आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे दाद मागण्याचे ठरविले. मात्र, गेल्या दोन महिन्यांपासून पोलिसांनी या गंभीर प्रकाराची दखलच घेतली नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे.

===Photopath===

200521\img_20210520_120200.jpg

===Caption===

पोलीस पाटील रमेश कदम

Web Title: Villagers boycott police Patil family!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.