सरपंचावरील फौजदारी कारवाईच्या निषेधार्थ ग्रामस्थांचा मोर्चा
By admin | Published: December 11, 2015 02:40 AM2015-12-11T02:40:54+5:302015-12-11T02:40:54+5:30
नागरिकांनी ठेवले शिवणी बंद; ‘एसपीं’ना निवेदन
अकोला: शिवणी येथील सरपंच प्रवीण पातोडे यांच्यावर दाखल विनयभंग गुन्ह्याच्या विरोधात गावकर्यांनी गुरुवारी शिवणी बंद ठेवले. तसेच त्यांच्यावरील आरोप खोटे असून, दाखल गुन्हे मागे घेण्यात यावे, अशी मागणी करीत गावकर्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा नेऊन निवेदन दिले. शिवणी येथील एका महिलेच्या विनयभंगप्रकरणी शिवणी ग्रामपंचायतीचे सरपंच प्रवीण पातोडे व इतर दोन युवकांविरुद्ध सिव्हिल लाइन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु, सरपंच यांच्यावरील आरोप खोटे असून, सदर महिला त्यांना फसविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे गावकर्यांचे म्हणणे आहे. सरपंच प्रवीण पातोडे यांच्यावरील गुन्हे मागे घेण्यात यावे, या मागणीसाठी शिवणी येथील गावकर्यांनी गुरुवार, १0 डिसेंबर रोजी गावात बंद पाळला. दरम्यान, गावातील महिला व आबालवृद्धांनी पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढला. सरपंच प्रवीण पातोडे यांच्यावरील आरोप खोटे असून, त्यांच्यावर दाखल गुन्हे मागे घेण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन गावकर्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिले.