वीर जवानाच्या शोकात रात्रभर जागले ग्रामस्थ; वडिलांशी झाले होते शेवटचे बोलणे!
By सदानंद सिरसाट | Published: July 7, 2024 03:14 PM2024-07-07T15:14:52+5:302024-07-07T15:16:11+5:30
सदानंद सिरसाट, अकोला : वीर जवान प्रवीण बाजीराव जंजाळ हे शहीद झाल्याची बातमी शनिवारी सायंकाळी गावात धडकताच कुटुंबिय, नातेवाईक, ...
सदानंद सिरसाट, अकोला : वीर जवान प्रवीण बाजीराव जंजाळ हे शहीद झाल्याची बातमी शनिवारी सायंकाळी गावात धडकताच कुटुंबिय, नातेवाईक, मित्र परिवारावर शोककळा पसरली. सर्वांनी आक्रोश करीत प्रवीणच्या आठवणींना उजाळा दिला. शनिवारची रात्र गावाने जागून काढली.
मोरगावातील वीर जवान प्रवीण जंजाळ हे शनिवारी दुपारी दक्षिण काश्मीरमधील कुलगाममध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत शहीद झाले. परिसरातील दोन गावात लपून बसलेल्या दहशतवाद्यांशी दोन हात करताना प्रवीण यांनाही मानेजवळ शत्रुची गोळी लागली. जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले.
याबाबत ग्रामपंचायत सरपंच उमा माळी यांना सैन्यदलाकडून माहिती देण्यात आली. कुटुबियांमध्ये सर्वप्रथम त्यांचा मोठा भाऊ सचिन जंजाळ यांनाही मेसेज देण्यात आला. यावेळी घरात असलेल्या त्यांच्या चुलत बहिणीने आक्रोश केला. ते ऐकून वडील प्रभाकरराव यांनाही परिस्थितीचा अंदाज आला. कुटुंबातील सदस्यांसह जमलेल्या ग्रामस्थांनाही अश्रू अनावर झाले. लगतच्या बुद्धविहारात प्रत्येकाने धाव घेतली. प्रवीणच्या आठवणीचे हुंदके आणि त्यासोबत त्याने सैन्यात भरती होण्याची त्याची कशी महत्वाकांक्षा होती, यालाही उजाळा दिला जात होता.
वडिलांशी झाले शेवटचे बोलणे
- प्रवीण यांनी शुक्रवारी सायंकाळी कुटुबियांशी संपर्क साधला होता. यावेळी त्यांची आई शालूबाई घरी नव्हत्या. त्यामुळे वडील प्रभाकरराव त्यांच्याशी बोलले. घराचे बांधकाम सुरू आहे. त्यासाठी पैसे पाठवल्याचेही त्यांनी सांगितले.
- भावाला शेवटचा मेसेज
प्रवीण यांनी कुटुंबियांसाठी रक्कम पाठवल्याचा मेसेज मोठा भाऊ सचिन यांना पाठवला. तो त्याने उशिरा पाहिला.
- रात्रभर जागले गाव
गावातील ग्रामस्थांनी रात्र जागून रात्र काढली.