ग्रामस्थांनी बंद पाडले पिंजर-निहीदा मार्गावरील पुलाच्या दुरुस्तीचे काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 03:58 PM2018-03-22T15:58:30+5:302018-03-22T17:25:33+5:30
बहिरखेड (जि. अकोला): बार्शीटाकळी तालुक्यातील निहिदा ते पिंजर मार्गावरील पिंजर्डा नदीवरील जुन्या पुलाची दुरुस्ती करण्याऐवजी या ठिकाणी नवीन व उंच पुल बांधावा, अशी मागणी करीत, परिसरातील सहा गावांचे सरपंच व ग्रामस्थांनी मंगळवारी पुलाच्या दुरुस्तीचे काम बंद पाडले.
- किरण ठाकरे
बहिरखेड (जि. अकोला): बार्शीटाकळी तालुक्यातील निहिदा ते पिंजर मार्गावरील पिंजर्डा नदीवरील जुन्या पुलाची दुरुस्ती करण्याऐवजी या ठिकाणी नवीन व उंच पुल बांधावा, अशी मागणी करीत, परिसरातील सहा गावांचे सरपंच व ग्रामस्थांनी मंगळवारी पुलाच्या दुरुस्तीचे काम बंद पाडले. वारंवार थातुरमातुर दुरुस्ती करण्याऐवजी कायमस्वरुपी नवीन पुल बांधण्यात यावा, अशा मागणीचे निवेदन ग्रामस्थांनी बुधवारी जिल्हा परिषद बांधकाम विभागास दिले.
निहिदा- पिंजर मार्गावरील नदीवर गेल्या ३० ते ३५ वर्षापूर्वी पुलाचे बांधकाम करण्यात आले होते. काळाच्या ओघात कमकुवत झालेल्या या पुलाची अतिशय दयनिय अवस्था झालेली असून, पुलावर मोठे भगदाड पडले आहे. सदर रस्ता हा अकोला जि. प. बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असल्याने, ग्रामस्थांनी या मार्गावर नवीन पुलाची बांधणी करून उंच पूल तयार करण्याची मागणी संबंधित विभागाकडे निवेदनाद्वारे केली आहे.२ परंतु जि. प. बांधकाम विभागाकडून या मागणीची दखल घेतल्या गेली नाही. आता आर्थिक वर्ष संपत आल्याचे पाहून अचानक जाग आलेल्या बांधकाम विभागाने या पुलाचे भगदाड बुजविण्यासाठी २ लाख रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला व २० मार्च रोजी कामाला सुरुवात केली. ही बाब समजताच मौजा बहिरखेड, निहिदा, सावरखेड, जमकेश्वर, पिंपळगाव हांडे आणि धाकली येथील सरपंच व ग्रामस्थांनी मंगळवारी पुलाच्या दुरुस्तीच्या कामाला विरोध केला. हा पूल शिकस्त झालेला असून , त्याला मलमपट्टी कशाला करता, त्याऐवजी नवीन पुलाचे बांधकाम करा, असे म्हणत ग्रामस्थांनी शिकस्त झालेल्या पुलाच्या दुरुस्तीचे काम बंद पाडले. एवढेच नव्हे, तर सरपंच व ग्रामस्थांनी बुधवार २१ मार्च रोजी कार्यकारी अभियंता बांधकाम जि. प. अकोला यांना निवेदन देऊन नवीन पुल बांधण्याची मागणी केली.
पुलावरून ९ ते १० गावांची वर्दळ
निहिदा ते पिंजय या रस्त्यावर ९ ते १० गावे आहेत. पिंजर हे मुख्य बाजारपेठ असल्याने शाळकरी विद्यार्थी व ग्रामस्थांना दररोज या मार्गावरील पुलावरून ये-जा करावी लागते. पावसाळ्यात नदीला पुर येऊन नेहमीच हा पुल वाहतुकीसाठी बंद असतो. त्यामुळे परिसरातील १० गावातील लोकांनी खासदार, आमदार यांच्याकडे निवेदन देऊन या मार्गावर नवीन पुलाची निर्मिती करण्याची मागणी लावून धरली आहे. (वार्ताहर)