गावक-यांनी टाकली वरली मटक्यावर धाड
By admin | Published: December 4, 2014 01:32 AM2014-12-04T01:32:17+5:302014-12-04T01:32:17+5:30
दहीहांडा पोलीस स्टेशनांतर्गत पुंडा येथे वरली मटक्यावर धाड.
आकोट ( अकोला) : पोलिसांऐवजी गावकर्यांनीच वरली मटक्यावर धाड टाकल्याची घटना दहीहांडा पोलीस स्टेशनांतर्गत येत असलेल्या पुंडा येथे बुधवारी घडली.
आकोट तालुक्यातील ग्रामीण भागात आकोट व दहीहांडा, अशी दोन पोलीस स्टेशन येतात. या पोलीस स्टेशनांतर्गत मोठय़ा प्रमाणात जुगार, दारू व ताजी वरली सुरू असल्याने ग्रामीण जनता वैतागली आहे. पोलीस दुर्लक्ष करीत असल्याने दहीहांडा पोलीस स्टेशनांतर्गत असलेल्या पुंडा या गावात ३ डिसेंबर रोजी सुनील कुलट, बाबूराव कुलट व प्रदीप कदम यांच्यासह ग्राम सुरक्षा दलाच्या कार्यकर्त्यांनी तलावाजवळ राजरोजपणे सुरू असलेल्या वरलीमटका अड्डय़ावर धाड टाकली. यावेळी वरलीमटका घेत असलेल्या पंजाब कोगदे नामक इसमाजवळून वरली चिठ्ठय़ासह इतर साहित्य जप्त केले. गावकर्यांनी धाड टाकल्याने एकच खळबळ उडाली. घटनास्थळावरून वरली मटका घेणारे पळून गेले. या प्रकरणी ग्रा.पं. सदस्य सुनील कुलट यांनी आकोट उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या कार्यालयात वरलीमटका साहित्य जमा करून रीतसर तक्रार दाखल केली आहे. या प्रकारामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. थातुरमातुर कारवाई केल्यानंतर आकोट ग्रामीण पोलीस स्टेशनाअतंर्गत जप्तीमधील साहित्य कमी दाखविल्या जात असल्याचीही ओरड आहे. आता थेट गावकरीच धाडी टाकत असल्याने जिल्हा पोलीस प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.