साथरोग सदृश आजार ठरताहेत ‘ताप’दायक!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2019 02:09 PM2019-07-10T14:09:41+5:302019-07-10T14:12:59+5:30
वातावरण बदलामुळे नागरिकांमध्ये आरोग्यविषयक समस्या जाणवू लागल्याने जिल्हाभरातील दवाखाने, रुग्णालयांमध्ये रुग्णांची गर्दी वाढली आहे.
अकोला: जिल्ह्यात डेंग्यू, चिकुनगुनिया सदृश तापाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली असून, अनेक रुग्णांमध्ये डोकेदुखी, हातापायात दुखण्याच्या समस्या दिसून येत आहेत. साथरोग सदृश आजार अकोलेकरांसाठी तापदायक ठरत असून, जिल्हाभरातील दवाखाने, रुग्णालये हाऊसफुल्ल झाले आहेत.
वातावरण बदलामुळे नागरिकांमध्ये आरोग्यविषयक समस्या जाणवू लागल्याने जिल्हाभरातील दवाखाने, रुग्णालयांमध्ये रुग्णांची गर्दी वाढली आहे. यातील बहुतांश रुग्णांमध्ये साथरोग सदृश आजारांची लक्षणे दिसून येत आहेत. विशेषत: डेंग्यू, चिकुनगुनिया या आजाराची लक्षणे दिसून येत असल्याने रुग्णांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. असे असले, तरी गत आठवडाभरात जिल्ह्यात डेंग्यू किंवा चिकुनगुनियाचा रुग्ण आढळला नसल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे; मात्र डेंग्यू आणि चिकुनगुनियाची लक्षणे आढळल्यास तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.
डेंग्यू, चिकुनगुनियाची लक्षणे
- अचानक थंडी वाजून ताप येणे
- डोकेदुखी, शरीर बधिर होणे
- पाठ दुखीचा त्रास
- भूक मंदावणे, जेवणाची इच्छा न होणे
- शरीर वाकल्यासारखे होणे
स्वाइन फ्लूपासून राहा सावध!
वातावरणातील बदलामुळे स्वाइन फ्लूचाही धोका वाढला आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वाइन फ्लूपासून सावध राहण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.
स्वाइन फ्लूची लक्षणे
ताप, डोकेदुखी, अंगदुखी, अशक्तपणा, छातीत दुखणे, घशात खवखवणे, सर्दी आदी लक्षणे आहेत.
हे करा
- घर व परिसरात स्वच्छता पाळा
- छतावर किंवा इतर ठिकाणी पाणी साठवणे टाळा
- शिळे अन्न खाण्यास टाळा
- पाणी उकळून प्यावे
- उघड्यावरील पदार्थांचे सेवन टाळा
- मॉस्किटो मॅट किंवा मच्छरदाणीचा उपयोग करा
रुग्णांमध्ये साथीच्या आजारांची लक्षणे दिसून येत आहेत. मात्र, यातील काही लक्षणे वातावरणातील बदलांचाही परिणाम असू शकतो. असे असले, तरी नागरिकांनी याकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांचा सल्ला घेऊन औषधोपचार करावा. आजारांपासून बचावासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात.
- डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक, अकोला.