चारित्र्यसंपन्न आई निर्माण करण्याचे ध्येय!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2018 02:39 PM2018-09-21T14:39:05+5:302018-09-21T14:44:43+5:30
मुला-मुलींवर संस्कार कसे होतील, याचा विचार करून समाजामध्ये चारित्र्यसंपन्न आई निर्माण व्हावी, घर आणि घरामधील संस्कृती टिकून राहावी, या दृष्टिकोनातून अंजनगाव सुर्जी येथील श्रीनाथपीठाधीश्वर जितेंद्रनाथ महाराज यांनी २0१0 मध्ये विश्वमांगल्य सभेची स्थापना केली.
-नितीन गव्हाळे
अकोला : आई ही घराचे मांगल्य, अस्तित्व आहे; परंतु सध्या पाश्चिमात्यकरणाच्या उदात्तीकरणात ही आई हरवत चालली आहे. चित्रपट, वाहिन्यांवरील बीभत्स नाटकांमुळे घरातील चारित्र्य, संस्कार नष्ट होत आहेत. त्यामुळे मुला-मुलींवर संस्कार कसे होतील, याचा विचार करून समाजामध्ये चारित्र्यसंपन्न आई निर्माण व्हावी, घर आणि घरामधील संस्कृती टिकून राहावी, या दृष्टिकोनातून अंजनगाव सुर्जी येथील श्रीनाथपीठाधीश्वर जितेंद्रनाथ महाराज यांनी २0१0 मध्ये विश्वमांगल्य सभेची स्थापना केली. विश्वमांगल्य सभेच्या माध्यमातून संपूर्ण देशभरामध्ये महिलांसाठी काम करणारे संघटन आणि त्यातून चारित्र्यसंपन्न, संस्कारशील आई निर्माण करण्याचे ध्येय याकडे आम्ही वाटचाल करीत आहोत, अशी माहिती राष्ट्रीय संघटनमंत्री डॉ. वैशाली गोविंद जोशी यांनी दिली.
डाबकी रोडवर जय बाभळेश्वर शिवभक्त मंडळाच्यावतीने आयोजित व्याख्यान देण्यासाठी त्या गुरुवारी अकोल्यात आल्या असता, त्यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला. यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष रेखा खंडेलवाल उपस्थित होत्या.
प्रश्न: विश्वमांगल्य सभेच्या स्थापनेमागे काय उद्देश आहे?
उत्तर: आधुनिकीकरण, पाश्चात्त्य अंधानुकरणामुळे आम्ही आमचा आचार, विचार, राहणीमान, परंपरा विसरत चाललो आहोत. घरातील आई चारित्र्यसंपन्न, संस्कारशील असेल, तर घरात तो विचार रुजतो. याच उद्देशाने आई नावाचे विद्यापीठ घरामध्ये निर्माण व्हावे, तिचे व्यक्तिमत्त्व, चारित्र्य कुटुंबाला संस्कार देणारे असावे आणि एक चारित्र्यसंपन्न आईचे निर्माण व्हावे, या दृष्टिकोनातून, याच विचारांनी विश्वमांगल्य सभा काम करीत आहे आणि त्या उद्देशानेच विश्वमांगल्य सभेची स्थापना झाली.
प्रश्न: राष्ट्र सेविका समिती असताना विश्वमांगल्य सभेची गरज काय?
उत्तर: राष्ट्र सेविका समितीचे कार्य महिलांचे संघटन आहे. त्यांचे कार्यक्षेत्र संपूर्ण राष्ट्र आहे आणि विश्वमांगल्य सभेचे कार्य हे उंबरठ्याच्या आतले घर आहे. उंबरठ्याच्या आत धर्म, संस्कृती टिकली तर ती बाहेरही टिकेल, हा आमचा उद्देश आहे. घरामधील महिलांसाठी काम करण्यासाठीच विश्वमांगल्य सभा आहे.
प्रश्न: शाळांमध्ये भगवद् गीता शिकविण्यास विरोध होत आहे. त्याबद्दल तुमचे मत काय?
उत्तर: हिंदू धर्म हा नुसता धर्म नाही. ती जीवन जगण्याची पद्धती आहे. भगवद् गीता हा केवळ ग्रंथ नाही. ते एक तत्त्वज्ञान आहे. समाजाच्या प्रत्येक घटकाला भगवद् गीता समजली पाहिजे. त्यासाठी भगवद् गीता शाळांमध्ये शिकविली गेली पाहिजे. त्याला विरोध करणे चुकीचे आहे. भगवद् गीता शाळेमध्ये शिकविल्यामुळे भगवीकरण, हिंदुत्व मोठे होणार नाही, हा समज संकुचित आहे.
प्रश्न : चारित्र्यसंपन्न आई निर्माण करण्याचे ध्येय!
विश्वमांगल्य सभेच्या राष्ट्रीय संघटनमंत्री वैशाली जोशी यांच्याशी संवाद
प्रश्न: सामाजिक कार्यात महिलांचा सहभाग कमी आहे. त्याबद्दल तुमचे काय मत आहे?
उत्तर: सामाजिक कार्यात महिलांचा सहभाग कमी आहे, असे नाही. महिलांचा सहभाग वाढत आहे. अनेक महिला सामाजिक कार्य करताना दिसतात. थोडी बंधने असल्यामुळे सहभाग कमी आहे; परंतु तो वाढला तर समाजात मोठी क्रांती घडून येईल.
प्रश्न: टीव्ही, इंटरनेटमुळे स्वैराचार, जीवनमूल्ये ढासळत आहेत का?
उत्तर: टीव्ही, इंटरनेटचा मोठा प्रभाव समाजावर होत आहे. आधुनिकतेचा पगडा वाढत आहे. संस्कार, संस्कृतीची पकड सुटत आहे. त्यासाठी विश्वमांगल्य सभेच्या माध्यमातून आई ही आईच वाटावी, ती बाई वाटू नये, जीवनमूल्ये जपली जावीत, चारित्र्य, संस्कार टिकावेत, यासाठी प्रयत्न होत आहेत. महाराष्ट्रात ६0 हजार कार्यकर्ते त्यासाठी काम करीत आहेत. येत्या काळात हा बदल दिसून येईल आणि संस्कारांची क्रांती होईल.