वीटभट्टीमालकांची अधिका-यांना जिवे मारण्याची धमकी

By admin | Published: February 9, 2016 02:26 AM2016-02-09T02:26:09+5:302016-02-09T02:26:09+5:30

चोहोट्टा बाजार येथील प्रकार; सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी ५0 जणांविरूद्ध गुन्हा दाखल.

Vithabhatta Police officials threaten to kill | वीटभट्टीमालकांची अधिका-यांना जिवे मारण्याची धमकी

वीटभट्टीमालकांची अधिका-यांना जिवे मारण्याची धमकी

Next

चोहोट्टाबाजार /आकोट: स्वामित्वधन वसुलीच्या कारणावरून येथील एका वीटभट्टीवर कारवाई करताना बुलडोझर चालविण्याचा प्रयत्न करणार्‍या अधिकार्‍यांच्या कामात वीटभट्टीमालकांनी अडथळा आणत त्यांना शिवीगाळ व जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना ८ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास येथे घडली. या घटनेची तक्रार आकोटच्या प्रभारी तहसीलदारांनी दिल्यावरून दहीहंडा पोलिसांनी चार मुख्य आरोपींसह ५0 जणांच्या जमावाविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. चोहोट्टा बाजार परिसरात अवैध माती उत्खनन व अवैध वीटभट्टय़ांवर कारवाई करण्याकरिता महसूल विभागाची तीन पथके सोमवारी गेली होती. त्यापैकी प्रभारी तहसीलदार अशोक गीते यांच्या पथकातील मंडळ अधिकारी प्रवीण घोटकर, तलाठी विनायक मालवे, नरेश रतन, वाहनचालक भास्कर चव्हाण, कनिष्ठ लिपिक प्रशांत गद्रे, शिपाई विनायक ढोरे हे एम एच ३0 एच ३७६ या शासकीय वाहनाने वासुदेव मुकुंदे यांच्या शेतात असलेल्या योगेश गव्हाळ यांच्या वीटभट्टीवर कारवाई करण्याकरिता गेले. महसूल विभागाच्या कारवाईची आणि पथक गव्हाळ यांच्या वीटभट्टीवर पोहोचल्याची माहिती कळताच परिसरातील अनेक वीटभट्टीमालक तेथे जमा झाले. येथे गोळा झालेल्या वीटभट्टीमालकांनी पथकातील अधिकार्‍यांशी रॉयल्टी भरूनही कारवाई का करीत आहात, असे म्हणत वाद घातला. त्यांना शिवीगाळ करीत जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच रास्ता रोको आंदोलन केले. या प्रकाराबाबत प्रभारी तहसीलदार अशोक गीते यांनी दहीहंडा पोलीस ठाण्यामध्ये तक्रार नोंदविली. त्यांच्या तक्रारीवरून दहीहंडा पोलिसांनी योगेश गव्हाळ, हुसेनशाह आशकान, अतुल धुमाळे, बंडू राठी यांच्यासह ५0 जणांच्या जमावाविरुद्ध भादंवि ३५३,१४३,१४७, ५0४,५0६ व ३४१ कलमान्वये गुन्हा दाखल केला.

Web Title: Vithabhatta Police officials threaten to kill

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.