‘व्हीएनआयटी’च्या तज्ज्ञ चमूने केली काँक्रिट रस्त्यांची तपासणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2019 01:49 PM2019-09-03T13:49:17+5:302019-09-03T13:49:27+5:30

नागपूरच्या विश्वश्वरैया नॅशनल इन्स्ट्यिट्युट आॅफ टेक्नॉलॉजी या संस्थेच्या तज्ज्ञ अभियंत्यांची चमू अकोल्यात दाखल झाली.

'VNIT' expert team examines concrete roads! | ‘व्हीएनआयटी’च्या तज्ज्ञ चमूने केली काँक्रिट रस्त्यांची तपासणी!

‘व्हीएनआयटी’च्या तज्ज्ञ चमूने केली काँक्रिट रस्त्यांची तपासणी!

Next

अकोला: शहरातील काँक्रिट रस्त्यांचे बांधकाम होऊन एक वर्ष झाले. या वर्षभरातच काँक्रिटच्या रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. या काँक्रिट रस्त्यांचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून, हे रस्ते ठिकठिकाणी उखडले आहेत. निकृष्ट रस्त्यांबाबत ‘लोकमत’ने सातत्याने वृत्त प्रकाशित करून रस्त्यांच्या कामांबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते आणि रस्त्यांच्या निकृष्ट बांधकामाची तपासणी करण्याचा मुद्दा उचलून धरीत रस्त्यांच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. अखेर महापालिकेंतर्गत नागपूरच्या विश्वश्वरैया नॅशनल इन्स्ट्यिट्युट आॅफ टेक्नॉलॉजी या संस्थेच्या तज्ज्ञ अभियंत्यांची चमू अकोल्यात दाखल झाली. या चमूने सोमवारी दुपारी शहरातील काँक्रिटच्या रस्त्यांची यंत्राच्या साहाय्याने तपासणी केली.
शहरामध्ये वर्षभरापूर्वी रतनलाल प्लॉट चौक ते टॉवर चौक, दुर्गा चौक ते अग्रसेन चौक, सिव्हिल लाइन चौक ते मुख्य डाक घर चौकापर्यंत कोट्यवधी रुपये खर्च करून काँक्रिट रस्त्यांचे बांधकाम करण्यात आले; परंतु रस्त्यांचे बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाल्यामुळे हे तीनही रस्ते ठिकठिकाणी उखडले आहेत.
ठिकठिकाणी रस्त्यावर खड्डे पडले आहेत. रतनलाल प्लॉट चौक ते टॉवर चौकादरम्यानच्या चवरे प्लॉटजवळ तर काँक्रिट रस्त्याची अक्षरश: चाळणी झाली आहे. यासोबतच जिल्हा स्त्री रुग्णालयासमोर, रालतो विज्ञान महाविद्यालयासमोरील काँक्रिट रस्त्यावरही खड्डे पडले आहेत. यावरून रस्त्यांच्या बांधकामाचा निकृष्ट दर्जा लक्षात येतो. यासंदर्भात ‘लोकमत’ने काँक्रिट रस्त्यांच्या निकृष्ट दर्जाबाबत सातत्याने वृत्त प्रकाशित करून रस्त्यांचे सोशल आॅडिट करण्याचा मुद्दा उचलून धरला होता.
महापालिका प्रशासनाने एका संस्थेकडून या रस्त्यांचे सोशल आॅडिटही करून घेतले होते; परंतु त्यावर पुढे काहीही झाले नाही. आता पुन्हा महापालिकेने नागपूरच्या विश्वश्वरैया नॅशनल इन्स्ट्यिट्युट आॅफ टेक्नॉलॉजी या संस्थेच्या तज्ज्ञ अभियंत्यांकडून काँक्रिट रस्त्यांचे सोशल आॅडिट सुरू केले. सोमवारी दुपारी तज्ज्ञ अभियंत्यांनी जिल्हा स्त्री रुग्णालयासमोरील काँक्रिट रस्त्याची यंत्राद्वारे तपासणी केली. यावेळी त्यांच्यासोबत मनपाचे अभियंता अजय गुजर हेसुद्धा होते.

Web Title: 'VNIT' expert team examines concrete roads!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.