स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी मतदान करा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2017 02:42 AM2017-02-17T02:42:53+5:302017-02-17T02:42:53+5:30
आंबेडकर यांचे प्रतिपादन; दोन दिवसात घेतल्या १२ कॉर्नर सभा
अकोला, दि. १६-संविधान टिकविले तर आपण टिकणार आहोत, असे सांगत स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी महानगरपालिका निवडणुकीत मतदान करा, असे प्रतिपादन भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड. प्रकाश उपाख्य बाळासाहेब आंबेडकर यांनी गुरुवारी येथे केले.
महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक १८ मधील भारिप-बमसं उमेदवारांच्या प्रचारार्थ शहरातील वाशिम रोडस्थित पंचशील नगरमध्ये आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. संविधानाच्या माध्यमातून बहुजन समाजाला हक्क मिळाले असून, आज संविधान बदलण्याची भाषा केली जात आहे.
त्यामुळे संविधान टिकविणे गरजेचे असून, संविधान टिकविले तर आपण टिकणार आहोत, त्यासाठी स्वातंत्र्य अबाधित राखण्याकरिता निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन अँड. आंबेडकर यांनी केले. निवडणुकीत केवळ जातीचा माणूस आहे, असा विचार न करता, काम करणार्या माणसाला जवळ करा, असे ते म्हणाले. यावेळी माजी मंत्री डॉ. डी.एम.भांडे, भारिप-बमसं निवडणूक निरीक्षक उपसमिती प्रमुख बालमुकुंद भिरड, डॉ. धैर्यवर्धन पुंडकर, जिल्हा परिषद उपाध्यक्ष जमीरउल्लाखा पठान, डॉ. प्रसन्नजित गवई, आसिफ खान, गजानन गवई, अमोल सिरसाट यांच्यासह पक्षाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते. अँड.आंबेडकरांनी गेल्या दोन दिवसात १२ कॉर्नर सभा घेतल्या हे विशेष !
भाजप-संघावर टीकास्त्र!
धार्मिक भावना भडकवून देशात सत्ता प्राप्त केल्यानंतर आज देशातील मुसलमानांना बाजूला ठेवले जात आहे, असे सांगत भाजप-संघ परिवारावर अँड. आंबेडकर यांनी टीकास्त्र सोडले.