मतदार यादीत घोळ; लोकप्रतिनिधींची मनपात धाव
By admin | Published: January 26, 2017 10:03 AM2017-01-26T10:03:32+5:302017-01-26T10:43:14+5:30
अकोला प्रभाग क्रमांक २, ३ मधील प्रकार; मतदारांच्या पत्त्यात बदल
अकोला: महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रशासनाने प्रसिद्ध केलेल्या प्रारूप मतदार यादीत काही ठराविक प्रगणकांनी जाणीवपूर्वक घोळ केल्याचे समोर आले आहे. प्रभाग क्रमांक २ आणि ३ मधील मतदारांच्या पत्त्यात बदल करून कागदोपत्री त्यांची ठिकाणे बदलण्यात आली. यासंदर्भात संबंधित नगरसेवक, कार्यकर्त्यांंनी आक्षेप नोंदवल्यानंतरही आक्षेप निकाली काढल्या जात नसल्याचे पाहून बुधवारी खासदार संजय धोत्रे, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार रणधीर सावरकर, महानगराध्यक्ष किशोर पाटील मांगटे, सभापती विजय अग्रवाल यांनी मनपात धाव घेतली.
राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मनपा प्रशासनाने १२ जानेवारी रोजी प्रारूप मतदार याद्या प्रकाशित केल्या. यंदा प्रथमच निवडणूक आयोगाने प्रभागनिहाय मतदार यादी तयार करण्यासाठी मोबाइल अँप निर्माण केले. संबंधित अँपवरून प्रभागांची मतदार यादी काढून मतदारांची संख्या तपासण्यात आली. यासाठी प्रशासनाने १२0 प्रगणकांची नियुक्ती केली होती. मनपाच्या स्तरावर १२ जानेवारी रोजी प्रारूप मतदार यादी प्रकाशित केल्यानंतर नागरिकांना हरकती व सूचना सादर करण्यासाठी पाच दिवसांचा म्हणजेच १७ जानेवारीपर्यंत अवधी देण्यात आला होता. शेवटच्या दिवसापर्यंंत ३७७ जणांनी मनपाकडे हरकती व सूचना नोंदवल्या. मनपा आयुक्त अजय लहाने यांच्या स्तरावर हरकती व सूचनांचा निपटारा केला जात असला, तरी बहुतांश प्रभागातील मतदारांची गठ्ठा नावे दुसर्याच प्रभागात सामील झाल्यामुळे विद्यमान नगरसेवकांसह इच्छुकांमध्ये भिती पसरली आहे. यामध्ये प्रामुख्याने प्रभाग क्रमांक २ आणि ३ मधील मतदारांच्या पत्त्यात अदला-बदल करण्यात आली असून, हा प्रकार जाणीवपूर्वक केल्याचा काही नगरसेवक व भाजपाच्या कार्यकर्त्यांंचा आक्षेप आहे. संबंधित प्रगणकांची भूमिका संशयास्पद ठरत आहे. या प्रकाराची दखल घेत बुधवारी लोकप्रतिनिधींनी मनपा उपायुक्त समाधान सोळंके यांची भेट घेतली. आक्षेप तातडीने निकाली काढण्याचे निर्देश उपायुक्तांना देण्यात आले आहेत. दरम्यान या संदर्भात आयुक्त अजय लहाने यांना विचारणा केली असता त्यांनी सदर प्रकरणाची चौकशी करणार असून चौकशीअंती दोषी आढळल्यास कारवाई केली जाईल अशी माहिती दिली.