मतदार याद्या प्रसिद्ध; ३१ आॅक्टोबरपर्यंत स्वीकारले जाणार आक्षेप!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2018 01:30 PM2018-09-02T13:30:59+5:302018-09-02T13:32:03+5:30
अकोला : आगामी सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदार नोंदणीची विशेष मोहीम जिल्ह्यात सुरू करण्यात आली असून, जिल्ह्यातील मतदान केंद्रांवर १ सप्टेंबर रोजी प्रारुप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.
अकोला : आगामी सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदार नोंदणीची विशेष मोहीम जिल्ह्यात सुरू करण्यात आली असून, जिल्ह्यातील मतदान केंद्रांवर १ सप्टेंबर रोजी प्रारुप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. मतदार याद्यांसंदर्भात ३१ आॅक्टोबरपर्यंत आक्षेप स्वीकारण्यात येणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आगामी सार्वत्रिक निवडणुकांसाठी १ जानेवारी २०१९ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्या अंतर्गत १ सप्टेंबर ते ३१ आॅक्टोबर या कालावधीत जिल्ह्यात मतदार नोंदणीची विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यामध्ये पात्र नवीन मतदारांची नोंदणी, दुबार, मयत व स्थलांतरित मतदारांची नावे मतदार यादीतून कमी करणे, मतदारांचे कृष्णधवल छायाचित्राऐवजी रंगीत छायाचित्र प्राप्त करणे, नावात व पत्त्यात दुरुस्ती इत्यादीसंदर्भात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ ) व तहसील स्तरावरील मतदार मदत केंद्रांमार्फत मतदारांकडून अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील १ हजार ६८० मतदान केंद्रांवर १ सप्टेंबर रोजी प्रारुप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या असून, १ सप्टेंबर ते ३१ आॅक्टोबर मतदार याद्यांसंदर्भात आक्षेप स्वीकारण्यात येणार आहेत. त्यानंतर ४ जानेवारी २०१९ रोजी अंतिम मतदार यादी जाहीर करण्यात येणार आहे. त्यानुषंगाने जिल्ह्यातील मतदारांनी मतदार यादी पाहून आपल्या नावासंदर्भात खात्री करावी. तसेच काही त्रुटी व दुरुस्ती हवी असल्यास, त्यासंदर्भात संबंधित ‘बीएलओ’ व तहसील स्तरावरील मतदार मदत कक्षाकडे अर्ज सादर करणे आवश्यक आहे, असे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी सांगितले. मतदार नोंदणी विशेष मोहिमेत जिल्ह्यात मतदार जागृतीसाठी विविध कार्यक्रम राबविण्यात येणार असून, त्यामध्ये दिव्यांग मतदारांच्या नोंदणीकडे लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे.जिल्ह्यात यापूर्वी १ हजार ५८५ मतदान केंद्र होते. त्यामध्ये ९५ मतदान केंद्र वाढविण्यात आल्याने जिल्ह्यातील मतदान केंद्रांची संख्या १ हजार ६८० झाली आहे, असेही जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी स्पष्ट केले. यावेळी निवासी उप जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, उप जिल्हाधिकारी (निवडणूक ) वैशाली देवकर, उप विभागीय अधिकारी संजय खडसे, नायब तहसीलदार सतीश काळे, श्रीकांत कोरकने उपस्थित होते.