मतदार नोंदणीच्या ‘डाटा एन्ट्री’चे काम सुरू!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2018 06:27 PM2018-11-24T18:27:53+5:302018-11-24T18:28:07+5:30
अकोला : मतदार याद्यांच्या विशेष पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत गत ३१ आॅक्टोबरपर्यंत करण्यात आलेल्या मतदार नोंदणीची ‘डाटा एन्ट्री’ करण्याचे काम राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयामार्फत सुरू आहे
अकोला : मतदार याद्यांच्या विशेष पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत गत ३१ आॅक्टोबरपर्यंत करण्यात आलेल्या मतदार नोंदणीची ‘डाटा एन्ट्री’ करण्याचे काम राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयामार्फत सुरू आहे. ‘डाटा एन्ट्री’चे काम पूर्ण झाल्यानंतर नवीन मतदार नोंदणीचे चित्र येत्या ३० नोव्हेंबरपर्यंत स्पष्ट होणार आहे.
निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार १ जानेवारी २०१९ या अर्हता दिनांकावर आधारित गत १ सप्टेंबर ते ३१ आॅक्टोबर या कालावधीत मतदार याद्यांचा संक्षिप्त विशेष पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात आला. त्यामध्ये राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात मतदार नोंदणीची विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत नवीन मतदारांची नावे मतदार यादीत समाविष्ट करणे, नावातील दुरुस्ती, पत्त्यामध्ये दुरुस्ती, नावे वगळणे यासंंदर्भात मतदारांकडून नमुना अर्ज भरून घेण्यात आले. मतदार नोंदणी मोहिमेत मतदारांकडून प्राप्त अर्जांची माहिती नोंदविण्याचे (डाटा एन्ट्री) काम राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयामार्फत सुरू आहे. ‘डाटा एन्ट्री’चे काम पूर्ण झाल्यानंतर मतदार नोंदणीच्या विशेष मोहिमेत मतदार यादीत नावे समाविष्ट करण्यासाठी प्राप्त झालेले अर्ज आणि त्याआधारे नवीन मतदार नोंदणीचे चित्र ३० नोव्हेंबरपर्यंत स्पष्ट होणार आहे.
थेट निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर ‘डाटा एन्ट्री’!
मतदार नोंदणी मोहिमेत मतदारांकडून स्वीकारण्यात आलेल्या अर्जांची माहिती (डाटा एन्ट्री) थेट निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर ‘अपलोड’ करण्याचे काम राज्यातील मतदार नोंदणी अधिकारी कार्यालय स्तरावर सुरू आहे.