शासकीय, निमशासकीय कार्यालयात तंबाखू मुक्तीची शपथ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2019 12:27 PM2019-08-18T12:27:27+5:302019-08-18T12:27:37+5:30
स्वातंत्र्य दिनानिमित्त १५ आॅगस्ट रोजी शासकीय व निम शासकीय कार्यालयांमध्ये तंबाखू मुक्तीची शपथ देण्यात आली.
अकोला: तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनावर नियंत्रणासाठी स्वातंत्र्य दिनानिमित्त १५ आॅगस्ट रोजी शासकीय व निम शासकीय कार्यालयांमध्ये तंबाखू मुक्तीची शपथ देण्यात आली. तसेच जिल्हा स्त्री रुग्णालयातून जनजागृती रॅली काढण्यात आली.
ग्लोबल अॅडल्ट टोबॅको सर्व्हे २०१६-१७ च्या एका सर्वेक्षणानुसार राज्यामध्ये अल्प वयातच तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणाऱ्यांमध्ये वाढ होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यावर नियंत्रणासाठी तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत १५ आॅगस्ट रोजी जिल्हा स्त्री रुग्णालयातून जनजागृती रॅली काढण्यात आली. या प्रसंगी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण यांनी रॅलीला हिरवी झेंडी दाखविली. यावेळी जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या अधीक्षिका डॉ. आरती कुलवाल, डॉ. एम. डी. राठोड यंची प्रमुख उपस्थिती होती. रॅलीमध्ये जिल्हा स्त्री रुग्णालय परिचर्या प्रशिक्षण स्कूल, सावित्रीबाई फुले नर्सिंग स्कूल, आझाद हिंद नर्सिंग स्कूल, महात्मा फुले पॅरामेडिकल नर्सिंग स्कूलमधील विद्यार्थिनींचा सहभाग होता. यासोबतच जिल्ह्यात विविध ठिकाणी ग्रामसभेत तंबाखू मुक्तीसंदर्भात जनजागृती करण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी डॉ. प्रीती कोगदे, धम्मसेन शिरसाट, जानराव अवघड, आशीष शिंदे, राधिका जाधव, सय्यद आरीफ यांनी परिश्रम घेतले.