वाडेगावातील दवाखान्यांची झाडाझडती!

By Admin | Published: April 12, 2017 01:55 AM2017-04-12T01:55:34+5:302017-04-12T01:55:34+5:30

अकोला- जिल्ह्यात दवाखाने, सोनोग्राफी सेंटर्सची तपासणीची धडाकेबाज मोहीम सुरूच असून, मंगळवारी वाडेगावातील दवाखान्यांची झाडाझडती केली.

Wadagawa hospitals dispersed! | वाडेगावातील दवाखान्यांची झाडाझडती!

वाडेगावातील दवाखान्यांची झाडाझडती!

googlenewsNext

अकोला: सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ येथील भ्रूणहत्या प्रकरणाच्या पृष्ठभूमीवर राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने काढलेल्या फर्मानानुसार, अकोला जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये दवाखाने आणि सोनोग्राफी सेंटर्सची तपासणी करण्याची धडाकेबाज मोहीम सुरूच असून, जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातील पथकाने मंगळवारी वाडेगावातील पाच दवाखान्यांकडे आपला मोर्चा वळवून तेथे तपासणी केली. या तपासणीदरम्यान अनेक त्रुटी आढळल्या असून, होमिओपॅथी डॉक्टर अ‍ॅलोपॅथीचे उपचार करताना आढळले. या दवाखान्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.
जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातील विधी समुपदेशक अ‍ॅड. शुभांगी खांडे, मंडळ अधिकारी देशमुख, बाळापूरच्या तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भावना हाडोळे आणि संदीप घाटोळ यांचा समावेश असलेल्या पथकाने मंगळवारी वाडेगावातील पाच दवाखान्यांची तपासणी केली. या दवाखान्यांमध्ये शासकीय नियमांची पायमल्ली होत असल्याच्या आॅनलाइन तक्रारी प्राप्त झाल्याच्या पृष्ठभूमीवर पथकाने ही कारवाई केली. यामध्ये वाडेगावचे पोलीस अधिकारीही सहभागी झाले होते.
वाडेगावातील डॉ.एच.डी. घाटोळ यांच्या घाटोळ क्लिनिकमध्ये बीएनएच अ‍ॅक्टचे उल्लंघन होत असल्याचे दिसून आले. या ठिकाणी ओपीडी रजिस्टर आढळून आले नाही तसेच अग्निपासून सुरक्षेसाठीची तरतूद न करण्यात आल्याचे आढळले. डॉ. प्रकाश मानकर यांच्या मानवता क्लिनिकमध्ये बीएनएच अ‍ॅक्ट आणि एमपीसी अ‍ॅक्टचे उल्लंघन होत असल्याचे पथकाच्या पाहणीत आढळले. डॉ. ऋषिकेश हिवराळे यांच्या विठ्ठल हॉस्पिटल अँड डेन्टल क्लिनिकमध्ये इनडोअर केसपेपर्स आढळून आले नाहीत. बायोमेडिकल वेस्ट अ‍ॅक्टचे पालन न करण्यासोबतच इमर्जन्सी ट्रे आणि स्टॉक रजिस्टरही गायब असल्याचे आढळून आले. डॉ. स्वप्निल गवई यांच्या विहान क्लिनिकमध्ये रुग्णांना भरती करून उपचार करण्यात येत असल्याचे आढळले. सोबतच एमपीसी अ‍ॅक्टचे उल्लंघन, फायर सेफ्टी अ‍ॅक्टचे उल्लंघन, बायोमेडिकल वेस्ट अ‍ॅक्टचे पालन न करण्यासोबतच, इनडोअर केसपेपर्स आणि स्टॉक रजिस्टर आढळून आले नाही. डॉ.नीलेश आणि डॉ.वरदा घाटोळ यांच्या नीलेश क्लिनिकमध्येही बॉम्बे नर्सिंग अ‍ॅक्टची पायमल्ली, बायोमेडिकल वेस्ट अ‍ॅक्टचे उल्लंघन आणि फायर सेफ्टी अ‍ॅक्टचे उल्लंघन होत असल्याचे आढळून आले. तपासणी पथकाने या पाचही डॉक्टरांनी विविध कायद्यांचे उल्लंघन केल्याप्रकरणी आपला अहवाल तयार केला असून, तो लवकरच जिल्हास्तरीय समितीला सोपविण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. आरोग्य पथकाद्वारे जिल्ह्यात विविध ठिकाणी अचानक धाडी टाकूनतपासण्या केल्या जात असल्या तरी कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या डॉक्टरांकडून रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरूच असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

वाडेगाव येथे खासगी डॉक्टरांकडून नियमांचे उल्लंंघन होत असल्याबाबतच्या आॅनलाइन तक्रारी प्राप्त झाल्या होत्या, त्यानुसार मंगळवारी विशेष पथकाने तेथे जाऊन डॉक्टरांच्या क्लिनिकची तपासणी केली. कारवाईबाबतचा अहवाल जिल्हास्तरीय समितीला सोपविला जाईल.
- डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक, अकोला

Web Title: Wadagawa hospitals dispersed!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.