वाडेगाव-अकोला मार्ग चिखलमय; वाहनचालक हैराण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:14 AM2021-06-24T04:14:46+5:302021-06-24T04:14:46+5:30
वाडेगाव: बाळापूर तालुक्यातील महत्त्वाचा मार्ग असलेला वाडेगाव-अकोला मार्ग चिखलमय झाला असून, वाहनचालक त्रस्त झाले आहेत. परिसरात बुधवारी पाऊस आल्याने ...
वाडेगाव: बाळापूर तालुक्यातील महत्त्वाचा मार्ग असलेला वाडेगाव-अकोला मार्ग चिखलमय झाला असून, वाहनचालक त्रस्त झाले आहेत. परिसरात बुधवारी पाऊस आल्याने रस्त्यावर चिखलच चिखल साचला होता. त्यामुळे वाहनचालकांना चिखलातून वाट शोधावी लागली. काही वाहनचालकाने अपघाताच्या भीतीने वाहन लोटत नेल्याचे दिसून आले. या मार्गावर वाहन घसरून अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. याकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन तत्काळ रस्त्याचे काम पूर्ण करण्याची मागणी होत आहे.
जिल्ह्याच्या मुख्यालयाशी जोडणारा वाडेगाव-अकोला हा मार्ग महत्त्वाचा असून, या मार्गावर नेहमीच वर्दळ असते. रस्त्याची दयनीय अवस्था झाल्याने वाहनचालकांना जीवघेणा प्रवास करावा लागत असल्याचे चित्र आहे.
वाडेगाव परिसरात ३० ते ४० गावे असून, या गावातील नागरिकांसाठी हा मार्ग महत्त्वाचा आहे. गत तीन वर्षांपासून नूतनीकरणाच्या नावाखाली अकोला-वाडेगाव मार्ग खोदून ठेवला आहे. त्यामुळे या रस्त्यावरून मार्गक्रमण करणाऱ्या वाहनांना व पादचाऱ्यांना चिखलातून तारेवरची कसरत करावी लागत आहे. याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत आहे.
पावसामुळे रस्त्यावर चिखल साचला असून, वाहनचालकांना धक्का मारून चिखलातून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे वाहनचालक त्रस्त झाले आहे. हा मार्ग त्वरित पूर्ण करण्याची गरज आहे.
-सैय्यद सादिक, ग्रामस्थ, वाडेगाव.
-----------------
चिखलमय रस्त्यामुळे अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. याकडे लोकप्रतिनिधींसह संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत आहे. रस्त्याचे काम त्वरित पूर्ण न झाल्यास आंदोलन छेडण्यात येईल.
-सुगत डोंगरे, सामाजिक कार्यकर्ते वाडेगाव