वाडेगावातील आंतरराष्ट्रीय जि. प. शाळेला आदर्श शाळेचा दर्जा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:13 AM2021-07-04T04:13:56+5:302021-07-04T04:13:56+5:30
राहुल सोनोने वाडेगाव : बाळापूर पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या वाडेगाव येथील भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय जिल्हा परिषद शाळेला ...
राहुल सोनोने
वाडेगाव : बाळापूर पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या वाडेगाव येथील भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय जिल्हा परिषद शाळेला आदर्श शाळेची मान्यता मिळाली आहे. विद्यार्थ्याचा शैक्षणिक भौतिक विकास व्हावा, हाच त्यामागचा उद्देश आहे. शासनाकडून याबाबत नुकतेच पत्र शाळेला प्राप्त झाले आहे. बाळापूर तालुक्यात आदर्श शाळेचा दर्जा मिळविण्याचा पहिला बहुमान या शाळेने पटकाविल्याने ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे.
बाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथे सन १८६९ मध्ये सुरू करण्यात आलेली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा (मुले) ही शाळा विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासात भर घालत आहे. निसर्गरम्य वातावरणात उभ्या असलेल्या शाळेच्या इमारतीतील सर्वच क्लासरूम डिजिटल करण्यात आल्या असून, विज्ञान रूमची स्वंतत्र व्यवस्था करण्यात आली आहे. मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक व गावकऱ्यांच्या पुढाकारातून या शाळेमध्ये नर्सरी केजी १ केजी २ पर्यंत कॉन्व्हेंट सुरू केले आहे. नुकतीच या शाळेला आदर्श शाळा म्हणून विकसित करण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे. तसे पत्र शासनाच्या शालेय शिक्षक व क्रीडा विभागाकडून शाळेला प्राप्त झाले आहे.
-------------------
दर शनिवारी भरणार दप्तरमुक्त शाळा
दर शनिवारी शाळेत दप्तरमुक्त शाळा भरणार आहे. या शाळेची आदर्श शाळा म्हणून निवड झाल्याने शैक्षणिक सुविधामध्ये विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकाच्या बाहेरील शिक्षण दिले जाणार आहे. विद्यार्थ्यांना प्राथमिक स्तरावर भाषा व गणित विषयातील मूलभूत संकल्पना शिकविल्या जाणार आहेत. नेतृत्व गुणाचे कौशल्यही शिकविले जाणार आहे.
------------------
शाळेला मिळाले अनेक पुरस्कार
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाडेगाव (मुले) या शाळेला यापूर्वी भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळेचा दर्जा प्राप्त झाला आहे. तसेच या शाळेला राज्यस्तरीय सर्वांगसुंदर शाळा पुरस्कार, कृतिशील शाळा पुरस्कार तसेच जिल्हा परिषद अकोला यांच्याकडून पटसंख्या वाढविल्याबद्दल प्रथम पुरस्कार मिळाला आहे.
-----------------
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाडेगाव (मुले) या शाळेला आदर्श शाळेचा दर्जा मिळाल्यामुळे वाडेगावसह परिसरातील गावांतील विद्यार्थ्यांना शाळेत दाखल केल्यानंतर दर्जेदार शिक्षण, सर्वांगीण शिक्षण, नैतिक शिक्षण मिळणार असल्यामुळे होतकरू विद्यार्थी तयार होतील.
- डी. आर. पवार,
केंद्रप्रमुख, वाडेगाव
----------------
वाडेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला (मुले) शासनाने आदर्श शाळा घोषित केले असून, त्याबाबतचे नुकतेच पत्र प्राप्त झाले आहे. वाडेगावसह ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणासोबत भौतिक सोयी-सुविधांचा लाभ मिळणार असल्यामुळे त्यांचा सर्वांगीण विकास होणार आहे.
-
समाधान सोर, मुख्याध्यापक
जि. प. प्राथमिक शाळा (मुले) वाडेगाव
----------------
वाडेगावातील जि. प. शाळा (मुले) या शाळेला आदर्श शाळेचा दर्जा मिळाल्याने गावातील गोरगरीब विद्यार्थ्यांना मोफत दर्जेदार शिक्षण मिळणार आहे. शिवाय, पालकांना आर्थिक भुर्दंड बसणार नाही. त्यामुळे पालकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
- संतोष काळे,
शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष
वाडेगाव