वडगाव, टिटवा ग्रामसेवकांना मुख्यालयाची ॲलर्जी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:16 AM2021-01-02T04:16:01+5:302021-01-02T04:16:01+5:30
येथून जवळच असलेले वडगाव, टिटवा, येथील ग्रामसेवक मुख्यालयी तर, सोडाच परंतु आठ- आठ दिवस गावात सुद्धा येत नाहीत, असा ...
येथून जवळच असलेले वडगाव, टिटवा, येथील ग्रामसेवक मुख्यालयी तर, सोडाच परंतु आठ- आठ दिवस गावात सुद्धा येत नाहीत, असा आरोप नागरिक करीत आहेत. ग्रामसेवक दररोज गावात येत नसल्याने नागरिकांना शासनाच्या योजनेची माहिती होत नाही. शिवाय गावात स्ट्रिट लाईट, रस्ते, पाणी, वीज या सारख्या समस्या भेडसावत आहेत. ग्रामपंचायतीच्या नियोजनशून्य कारभारामुळे गावातील करपट्टी वसुली थांबली असून, नागरिकांना वेळेवर अर्ज मिळत नाही. ग्रामसेवक नागरिकांचे फोन उचलत नाहीत. त्यांना भेटण्यासाठी पंचायत समितीमध्ये जावे लागते. त्यांना मुख्यालयी आणि दररोज गावात का येत नाही, अशी विचारणा केली तर, ते उडवाउडवीची उत्तरे देतात. अनेक घरकूल लाभार्थ्यांना शासनाचे पूर्ण अनुदान मिळाले नसून, नवीन घरकूल मंजुरीबाबत ग्रामसेवकाचा पुढाकार दिसत नाही. वडगाव, टिटवा या दोन्ही गावात शौचालय योजनेपासून काही लाभार्थी वंचित असून, नागरिकांना रस्त्यावरच शौचास बसावे लागत आहेत. त्यामुळे या गावात स्वच्छतेचे तीनतेरा वाजले आहेत. या गावात घाणीचे साम्राज्य पसरल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा धोका निर्माण झाला आहे.
वडगाव येथे ग्रामसेवक प्रशांत रुपनारायण, टिटवा येथे धीरज अनकिडे हे कार्यरत असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. त्यासाठी सीईओ यांनी दखल घेऊन या गावातील ग्रामसेवकांना मुख्यालयी ठेवून नागरिकांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी होत आहे. याबाबत ग्रामसेवक रुपनारायण व अनकिडे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही. गटविकास अधिकारी किशाेर काळबांडे यांच्याशी संपर्क साधला असता ते उपलब्ध हाेऊ शकले नाही.