वाडी अदमपूरवासियांचा आठवडाभरापासून पाणी पुरवठा बंद!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2017 01:28 AM2017-11-04T01:28:27+5:302017-11-04T01:29:13+5:30
वाडी अदमपूर : गटग्रामपंचायत पाणी पुरवठा योजनेच्या बोअरवेलचे विद्युत देयक न भरल्याने वीज वितरण कंपनीने या बोअरवेलचा वीज पुरवठा खंडित केल्याने गावातील पाणीपुरवठा मागील आठवडाभरापासून ठप्प आहे. त्यामुळे ग्रामस्थांची पाण्यासाठी पायपीट सुरू आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाडी अदमपूर : गटग्रामपंचायत पाणी पुरवठा योजनेच्या बोअरवेलचे विद्युत देयक न भरल्याने वीज वितरण कंपनीने या बोअरवेलचा वीज पुरवठा खंडित केल्याने गावातील पाणीपुरवठा मागील आठवडाभरापासून ठप्प आहे. त्यामुळे ग्रामस्थांची पाण्यासाठी पायपीट सुरू आहे. वाडी अदमपूर गावात आधीच सहा दिवसांआड पाणी पुरवठा, त्यातच गत आठवड्यापासून पाणी बंद असल्याने गावात पाणी समस्येने उग्र रूप धारण केले आहे.
वाडी अदमपूर गटग्रामपंचायत पाणी पुरवठा योजनेचे गावात तीन बोअरवेल आहेत. त्यामधील एक बोअरवेल पाणी पुरवठा दोन वस्तीत एक दिवसाआड करण्यात येतो, तर उर्वरित दोन बोअरवेलचा पाणी पुरवठा जलकुंभाद्वारे गावात सहा दिवसांआड करण्यात येतो.
गावात पाणी पुरवठा करणारी बोअरवेल बंद झाल्याने नागरिकांना पाण्यासाठी मोठय़ा प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. नागरिकांना शेतातून एक ते दोन कि.मी. अंतरावरून पाणी आणावे लागते. गावात असलेल्या हातपंपामध्ये एक किंवा दोन हातपंप पाण्यायोग्य पाणी आहे. उर्वरित हातपंपांना गढूळ पाणी येते.
सध्या हिवाळ्याच्या दिवसांत महिला, आबालवृद्धांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. गेल्या आठवड्यापासून गावातील पाणी पुरवठा बंद असूनसुद्धा ग्रा. पं. कडून कोणत्याही प्रकारचे पाऊल अद्याप उचलण्यात आले नसल्याने जनतेमध्ये संताप व्यक्त होत आहे.
ग्रा. पं.चा पाणी कर मोठय़ा प्रमाणात थकीत आहे. यामुळे बोअरवेलचा वीज पुरवठा खंडित करण्याबाबत ग्रामपंचायत प्रशासनाला महावितरण कंपनीकडून नोटीस बजावल्या होत्या. वीज पुरवठा खंडित होण्याबाबत पूर्वकल्पना असतानासुद्धा याबाबत ग्रामपंचायत प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारचे पाऊल उचलण्यात आले नाही. दरम्यान सचिव गावात येत नसल्यामुळे नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते. वाडी अदमपूर गटग्रामपंचातच्या सचिव, सरपंच तसेच ग्रा. पं. सदस्य यांच्यामध्ये समन्वय नसल्याने वाडी अदमपूर गावातील जनतेला पाणी समस्येसह विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. वरिष्ठ अधिकार्यांनी याबाबत दखल घेऊन वाडी अदमपूर गावातील पाणी पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष
गटग्रामपंचायत प्रशासनाचे गावात तीन बोअरवेल आहेत. या तीन बोअरवेलच्या विद्युत देयकापोटी असलेली रक्कम सात लाखांच्या आसपास आहे. ही थकीत रक्कम भरण्याबाबतच्या नोटीस महिन्याआधीच महावितरण कंपनीने ग्रामपंचायत प्रशासनाला बजावल्या होत्या. तसेच वीज बिल भरण्यासंबंधी वारंवार सूचनासुद्धा देण्यात आल्याचे सूत्राकडून सांगण्यात आले; परंतु ग्रा.पं.ने वीज बिल न भरल्याने वीज पुरवठा खंडित करण्याची कार्यवाही महावितरण कंपनीकडून करण्यात आली.
समन्वयाचा अभाव
बोअरवेलचा पाणी पुरवठा आठवड्यापासून ठप्प आहे; परंतु ग्रा. पं. प्रशासनाकडून याबाबत कोणत्याही प्रकारची उपाययोजना करण्यात आली नाही. त्यामुळे ग्रा. पं.च्या अनागोंदी कारभाराविषयी जनतेमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. पाणी पुरवठा योजनेची थकबाकी मोठय़ा प्रमाणात आहे. तसेच गावात मोठय़ा प्रमाणात अवैध नळ कनेक्शन आहेत. यावर ग्रा. पं. कार्यवाही का करण्यात येत नाही, असा सवाल नागरिकांतून उपस्थित होत आहे. सचिव, सरपंच व ग्रा.पं. सदस्य यामध्ये समन्वय नसल्याने नागरिकांना पाणी समस्येला सामोरे जावे लागत आहे.
गावात पाणी कर वसुली चालू आहे. दोन-तीन दिवसांत वीज बिल भरून पाणी पुरवठा सुरू करू.
- व्ही. व्ही. चव्हाण,
सचिव, ग्रामपंचायत वाडी अदमपूर.
आधीच आठवड्यातून एकदाच पाणी मिळते. बारा दिवसांपासून पाणी बंद असल्याने शेतातून पाणी आणावे लागते.
- सुनील वर्गे, नागरिक, वाडी अदमपूर.
-