हरभरा सोंगणीची मजुरी महागली; शेतकऱ्याला आर्थिक भुर्दंड!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:25 AM2021-02-26T04:25:03+5:302021-02-26T04:25:03+5:30
अमोल सोनोने पांढुर्णा : गतवर्षी चांगला पाऊस झाल्याने परिसरात रब्बी हंगामात हरभऱ्याचा पेरा वाढला आहे. सध्या हरभऱ्याची सोंगणी ...
अमोल सोनोने
पांढुर्णा : गतवर्षी चांगला पाऊस झाल्याने परिसरात रब्बी हंगामात हरभऱ्याचा पेरा वाढला आहे. सध्या हरभऱ्याची सोंगणी सुरू झाली असल्याने शेतकरी कामात व्यस्त आहे. गतवर्षीपेक्षा सोंगणीचे दर वाढल्याने शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. पातूर तालुक्यातील ग्रामीण भागात हरभरा सोंगणीचा दर प्रति एकर २ हजार रुपये व एका दिवसाची २०० रुपयांपर्यंत मजुरी द्यावी लागत असल्याने शेतकऱ्याला आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
यंदा सततचा पाऊस व परतीच्या पावसानेे खरीप हंगामातील सर्वच पिकांची नासाडी झाली. तसेच कपाशीच्या वेचणीच्या सुरुवातीलाच बोंडअळीने आक्रमण केल्याने उत्पादनात प्रचंड घट झाल्याने खर्चही वसूल झाला नाही. तरीही शेतकऱ्यांनी मोठ्या हिमतीने पैशांची जुळवाजुळव करून रब्बी हंगामात पेरणी केली. परिसरात हरभऱ्याला पसंती दिली आहे. सध्या हरभरा सोंगणी सुरू झाली आहे. हरभरा सोंगणीचा दर वाढल्याने शेतकऱ्यांना खर्च न परवडणारा झाला आहे. तर दुसरीकडे, महागाई महागल्याने हातावर पोट असणाऱ्या मजुरांनाही दर वाढविल्याशिवाय पर्याय नसल्याचे मजुरांनी सांगितले. (फोटो)
----------------------------
ढगाळ वातावरणामुळे नुकसान
हरभऱ्याचे पीक शेतात बहरलेले असताना चांगले उत्पादन होऊन अशी आशा शेतकऱ्यांना लागून होती; मात्र ऐन फुलधारणाच्या वेळी ढगाळ वातावरण व पहाटेच्या सुमारास पडलेल्या धुक्यामुळे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सध्या परिसरात हरभऱ्याचा प्रति एक्कर ३ ते ४ क्विंटलच उत्पादन होत असल्याचे चित्र आहे.
-------------------------------
महागाई वाढल्याने मजुरी न परवडणारी झाली आहे. हाताला दुसरे काम नसल्याने पोट भरण्यासाठी शेतात काम करावे लागते. त्यामुळे मजुरी वाढविणे नाइलाज आहे. सरकारने किसान सन्मान योजनेसारखी मजुरांसाठी योजना अमलात आणून मजुरांना दिलासा द्यावा.
सुधाकर शेळके - शेतमजूर
------------------------------
ढगाळ वातावरणामुळे हरभऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे उत्पादनात प्रचंड घट येत आहे. अशातच मजुरी महागल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
सुरेश देवकते -शेतकरी.
---------------------------------------
हरभरा सोंगणी-२,००० ते २,२०० रुपये प्रति एक्कर
हरभरा काढणी- २०० रुपये पोते
उत्पादन- ३ ते ४ क्विटंलच