तेरवीचा कार्यक्रम रद्द करून वाहिली श्रद्धांजली!
By admin | Published: June 30, 2016 01:45 AM2016-06-30T01:45:06+5:302016-06-30T01:45:06+5:30
गुरुदेव सेवक कुटुंबाचा आदर्श : प्रबोधनात्मक कार्यक्रमातून दिली नवी दिशा.
अकोला : इहलोकीची यात्रा संपवून निजधामास गेलेल्या आपल्या आप्तस्वकियांची तेरवी करण्याची परंपरा समाजात पिढय़ान्पिढय़ा सुरू आहे. बाश्रीटाकळी तालुक्यातील आळंदा (रुस्तमाबाद) येथील गुरुदेव सेवा मंडळाशी जुळलेल्या एका कुटुंबाने मात्र वर्षानुवर्षे चालत आलेल्या या परंपरेला फाटा देऊन नवीन आदर्श ठेवला आहे. वडिलाच्या तेरवीचा कार्यक्रम रद्द करून त्याऐवजी श्रद्धांजलीपर कार्यक्रमाचे आयोजन करून या कुटुंबाने समाजासमोर नवीन प्रेरणाच ठेवली आहे. ग्राम आळंदा येथील गुरुदेव सेवामंडळाचे सेवाधारी पांडुरंग गंगाराम काकड यांचे १६ जून रोजी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र डॉ. गजानन काकड व कुटुंबीयांनी श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून कर्मकांडाचे प्रतीक असलेला तेरवीचा कार्यक्रम व इतर सोपस्कारांना तिलांजली देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार स्व. पांडुरंग काकड यांच्या अस्थी गुरुकुंज मोझरी येथील अस्थिकुंडात विसजिर्त करण्यात आल्या. तसेच पिंडदान, मुंडन, दसवा आदी सोपस्कारांनाही काकड कुटुंबीयांनी फाटा दिला. या प्रथा, परंपरांना कुठलाही आधार नसल्यामुळे श्री गुरुदेव पद्धतीने प्रबोधनात्क कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी आचार्य हरिभाऊ वेरुळकर, मधुकर खोडे महाराज, प्रबोधनकार सप्तखंजेरीवादक सत्यपाल महाराज, गुलाबराव महाराज, ज्ञानेश्वर रक्षक, रामेश्वर खोडे महाराज, संदीपपाल महाराज यांचे समाजाला दिशा देणारे प्रबोधन पार पडले. खोडे महाराजांनी व्यसनमुक्तीची शपथ देऊन असे कार्यक्रम सर्वत्र व्हावे, असे आवाहन केले. सामूहिक मौन श्रद्धांजली व राष्ट्रवंदना घेऊन या कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.