प्रतीक्षा संपली : १८ ते ४४ वयोगटातील लाभार्थींना आजपासूनच मिळणार लस!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:17 AM2021-05-01T04:17:32+5:302021-05-01T04:17:32+5:30
अकोला : कोविड लसीकरण मोहिमेंतर्गत १८ ते ४४ वयोगटातील लाभार्थींची प्रतीक्षा संपली असून, १ मेपासूनच त्यांना लस दिली जाणार ...
अकोला : कोविड लसीकरण मोहिमेंतर्गत १८ ते ४४ वयोगटातील लाभार्थींची प्रतीक्षा संपली असून, १ मेपासूनच त्यांना लस दिली जाणार आहे. पहिल्या दिवशी लसीकरणाला दुपारी १ वाजल्यापासून सुरुवात होणार आहे. ही मोहीम महापालिका क्षेत्रातील पाच केंद्रांवरच राबविण्यात येणार आहे. ऑनलाईन नोंदणी केलेल्या लाभार्थींनाच लस मिळणार असल्याने लाभार्थींना कोविन संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करावी लागणार आहे. दिनांक १ मेपासून सुरू होणाऱ्या कोविड लसीकरण मोहिमेसाठी पहिल्या टप्प्यात जिल्ह्याला कोविशिल्ड लसीचे ७ हजार ५०० डोस उपलब्ध झाले आहेत. लसीचा साठा मर्यादित आल्याने महापालिका क्षेत्रातील पाच केंद्रांवरच लसीकरणाला सुरुवात करण्यात येईल. लसीचा पुरवठा वाढल्यास इतर केंद्रही कार्यान्वित केली जाणार आहेत. या संदर्भात जिल्हा प्रशासनामार्फत देण्यात आलेल्या माहितीनुसार, लसीकरणासाठी लाभार्थ्यांना कोविन ॲपवरुन नोंदणी करणे व त्यानुसार लसीकरणाची तारीख व वेळ निश्चित करणे अनिवार्य आहे. लस उपलब्ध होण्यास होणारा संभाव्य उशीर लक्षात घेता, १ मे रोजी लसीकरण हे दुपारी एक ते पाच यावेळेत करण्यात येईल. अन्य दिवशी लसीकरण हे सकाळी नऊ ते पाच यावेळेत सुरु राहणार असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले. वाढत्या उन्हाची तीव्रता लक्षात घेता, महापालिका क्षेत्रात सोमवार ३ मेपासून लसीकरणाची वेळ सकाळी सात ते दुपारी एक करण्याचा निर्णय मनपा आयुक्त निमा अरोरा यांनी घेतला आहे. नोंदणीनंतर निश्चित केलेल्या वेळेत लसीकरण केंद्रावर नाव नोंदवून आपले टोकन प्राप्त करुन घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.
या केंद्रांवर होणार लसीकरण
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय
भरतीया रुग्णालय
कस्तुरबा रुग्णालय (डाबकी रोड)
आर. के. टी. आयुर्वेद कॉलेज (जठार पेठ)
जिल्हा स्त्री रुग्णालय
यांनी लस टाळावी
गर्भवतींना लस नाही
स्तनदा मातांना लस नाही.
तर ४ आठवड्यानंतर घ्या लस
कोरोनामधून नुकतेच बरे झालेल्या रुग्णांनी कोरोनातून बरे झाल्यानंतर सुमारे ४ आठवड्यांनी लस घ्यावी, असे आवाहन तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केले आहे.