अखेर पाठ्यपुस्तकांची प्रतीक्षा संपली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:23 AM2021-09-17T04:23:39+5:302021-09-17T04:23:39+5:30
पातूर : कोरोना महामारीचा संसर्ग वाढू नये म्हणून गेल्या दीड वर्षापासून शाळा महाविद्यालय बंद आहेत. त्यातच कोरोनाची तिसरी लाट ...
पातूर : कोरोना महामारीचा संसर्ग वाढू नये म्हणून गेल्या दीड वर्षापासून शाळा महाविद्यालय बंद आहेत. त्यातच कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. असे असताना सुद्धा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून ज्या भागात कोरोनाचे रुग्ण नाही त्या भागातील शाळा सुरू करण्यात आल्या. परंतु विद्यार्थ्यांजवळ पाठ्यपुस्तकेच नसल्यामुळे पुढील शिक्षण घेणार कसे, असा प्रश्न निर्माण झाला होता. परंतु लोकमतने मोफत पाठ्यपुस्तक योजनेचा वाजला बोजवारा असे वृत्त प्रकाशित करताच पुस्तक वाहतुकीचा करार केलेल्या मे. शिरीष कार्गो प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे डोळे उघडले असून पंचायत समिती स्तरावरून केंद्र शाळास्तरावर पुस्तके वितरित करण्यासाठी वाहनाची व्यवस्था करून दिली आहे.
त्यामुळे येत्या दोन-तीन दिवसात सर्व केंद्र शाळेपर्यंत पुस्तके वितरित करण्याचे काम पूर्ण होऊन लवकरच विद्यार्थ्यांपर्यंत पाठ्यपुस्तके पोहोचणार आहेत त्यामुळे तब्बल तीन महिन्यापासून पाठ्यपुस्तकाच्या प्रतीक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा आता संपणार आहे. समग्र शिक्षा अभियान अंतर्गत मोफत पाठ्यपुस्तक व स्वाध्याय पुस्तिकेचे वितरण बालभारती भांडार ते तालुका स्तरावरुन केंद्र शाळेपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी शासनाने संबंधित खासगी कंपनीला दिली होती. पुस्तकाची वाहतूक विहीत कालमर्यादेत करण्याचा आदेश असतानाही संबंधित कंत्राटदार यांच्या हलगर्जीमुळे वर्ग १ ते ८ ला शिकणाऱ्या १३ हजार विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य टांगणीला लागले होते.
१३२ शाळांना मिळणार पाठ्यपुस्तके!
सदर मोफत पाठ्यपुस्तके योजनेंतर्गत तालुक्यातील वर्ग १ ते ८ च्या तब्बल १३ हजार विद्यार्थ्यांना याचा लाभ होतो. तालुक्यात एकूण १६९ शाळांपैकी १३२ शाळांना पुस्तके वितरित करायची आहेत. त्यापैकी ९९ शाळा जिल्हा परिषद व्यवस्थापनाच्या असून इतर खासगी व्यवस्थापनाच्या आहेत. परंतु पंचायत समिती स्तरावरून केंद्र स्तरापर्यंत पर्यायाने विद्यार्थ्यांपर्यंत पुस्तके पोहोचली नसल्यामुळे पालकांमध्ये असंतोष होता.
कोट
केंद्र शाळेपर्यंत पाठ्यपुस्तके वितरित करायला वाहन उपलब्ध झाले असून येत्या एक-दोन दिवसात सर्व केंद्र शाळेपर्यंत पाठ्यपुस्तके पोहोचतील व लवकरच विद्यार्थ्यांना पुस्तके वितरित करण्याचे नियोजन केले जाईल
-दीपमाला भटकर, शिक्षण विस्तार अधिकारी पंचायत समिती पातूर
फोटो:
पंचायत समिती स्तरावरून केंद्रस्तरावरून शाळेपर्यंत पाठ्यपुस्तके उपलब्ध झाली असून केंद्राअंतर्गत येणाऱ्या सर्व शाळांवर उद्यापासून पुस्तके वितरित केल्या जातील.
-बी.पी. फलटणकर, केंद्रप्रमुख न. प. खासगी केंद्र
फोटो: