‘सामाजिक न्याय भवन’च्या लोकार्पणाची प्रतीक्षा ! 

By संतोष येलकर | Published: June 26, 2023 04:53 PM2023-06-26T16:53:29+5:302023-06-26T16:53:49+5:30

दिमाखदार इमारतीचे काम पूर्ण; पण वीज पुरवठयाअभावी रखडले इमारतीचे हस्तांतरण

Waiting for the inauguration of 'Social Justice Bhavan' in akola | ‘सामाजिक न्याय भवन’च्या लोकार्पणाची प्रतीक्षा ! 

‘सामाजिक न्याय भवन’च्या लोकार्पणाची प्रतीक्षा ! 

googlenewsNext

अकोला : शहरातील निमवाडी परिसरात डाॅ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनाच्या दिमाखदार इमारत उभारणीचे काम पूर्ण करण्यात आले असले तरी, वीज पुरवठा सुविधांच्या कामाअभावी हस्तांतरण अद्याप बाकी आहे. त्यामुळे कोट्यवधी रुपयांचा निधी खर्चून साकारण्यात आलेल्या ‘सामाजिक न्याय भवन’चे लोकार्पण होणार तरी कधी, याबाबतची प्रतीक्षा केली जात आहे.

अकोला शहरातील राष्ट्रीय महामार्गालगत निमवाडी भागात डाॅ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनाची इमारत उभारण्यात आली आहे. गेल्या २०१८ पासून या भवनाचे बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुरू करण्यात आले. अकोला शहराच्या वैभवात भर टाकणाऱ्या या सामाजिक न्याय भवनाची दिमाखदार इमारत उभारणीचे काम पूर्ण करण्यात आले. शासनामार्फत उपलब्ध झालेल्या जवळपास १८ कोटी रुपयांच्या निधीतून सामाजिक न्याय भवनाची भव्यदिव्य इमारत साकारण्याचे काम करण्यात आले. या पार्श्वभूमीवर या इमारतीमध्ये समाजकल्याण विभागाच्या सहायक आयुक्त कार्यालयाचे कामकाज गेल्या सात महिन्यांपासून सुरू करण्यात आले. परंतु, इमारत उभारणीचे काम पूर्ण करण्यात आले असले तरी, नवीन रोहित्र आणि इमारतीमधील वीजपुरवठा सुविधेचे काम अद्याप पूर्ण करण्यात आले नसल्याने, सामाजिक न्याय भवनाच्या या इमारतीचे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून समाजकल्याण विभागाकडे हस्तांतरण करण्याची प्रक्रिया रखडली आहे. त्यामुळे समाजकल्याण विभागासोबतच संबंधित विभागांच्या कार्यालयांचे कामकाज या इमारतीमध्ये सुरू होणे अद्याप बाकी आहे. त्याअनुषंगाने वीज पुरवठ्यासह अंतर्गत इतर अनुषंगीक कामे केव्हा पूर्ण होणार आणि सामाजिक न्याय भवनाचे लोकार्पण कधी होणार, याबाबतची प्रतीक्षा केली जात आहे.

सामाजिक न्याय भवनात ‘या’

कार्यालयांचे सुरू होणार कामकाज !
सामाजिक न्याय भवनाच्या इमारतीमध्ये समाजकल्याण विभागाच्या सहायक आयुक्त कार्यालयासोबतच संबंधित विभागांच्या कार्यालयांचे कामकाज सुरू करण्यात येणार आहे.

जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालय, महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, वसंतराव नाईक विकास महामंडळ, दिव्यांग कल्याण महामंडळ, बहुजन कल्याण विभाग आदी विविध विभागांच्या कार्यालयांचे कामकाज समाजिक न्याय भवनाच्या इमारतीमध्ये सुरू होणार आहे.

Web Title: Waiting for the inauguration of 'Social Justice Bhavan' in akola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Akolaअकोला