घरकूल लाभार्थीना अनुदानाची प्रतिक्षा 

By admin | Published: February 13, 2017 04:48 PM2017-02-13T16:48:05+5:302017-02-13T16:48:05+5:30

पाचशेच्यावर लाभार्थींना अद्याप अनुदान मिळाले नसल्याने या लाभार्थींचे घरकुलाचे स्वप्न अर्धवटच आहे.

Waiting for Grant Beneficiary Beneficiaries | घरकूल लाभार्थीना अनुदानाची प्रतिक्षा 

घरकूल लाभार्थीना अनुदानाची प्रतिक्षा 

Next

जिल्ह्यातील वास्तव: पाचशेच्यावर लाभार्थी वंचित
वाशिम: जिल्ह्यात इंदिरा आवास योजनेंतर्गत गतवर्षी मंजूर झालेल्या ६ हजार ६१९ घरकूलांचे पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्याचे काम पूर्ण होऊनही पाचशेच्यावर लाभार्थींना अद्याप अनुदान मिळाले नसल्याने या लाभार्थींचे घरकुलाचे स्वप्न अर्धवटच आहे.
शासनाच्या इंदिरा आवास योजनेंतर्गत गतवर्षी जिल्ह्यात ६ हजार ६१९ घरकुलांना मंजुरी देण्यात आली. पात्र लाभार्थीनी या घरकुलांचे कामही सुरू केले आणि अनेक लाभार्थीनी पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्याचे काम पूर्ण केले; परंतु यातील अनेक लाभार्थींना पुढील काम करण्यासाठी नियमानुसार अनुदानाचे हप्तेच मिळालेले नाहीत. त्यामुळे या लाभार्थींच्या कुटुंबांना आता उघड्यावर राहण्याची पाळी आली आहे. या संदर्भात जिल्हा ग्रामीण विकास संस्थेच्या संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांशी संवाद साधून माहिती घेतली असता काही लाभार्थींचे अनुदान तांत्रिक कारणामुळे थांबले असल्याचे सांगण्यात आले. तथापि, पहिल्या टप्प्याच्या अनुदानापासून ३००, दुसऱ्या टप्प्याच्या अनुदानापासून २४०, तर तिसऱ्या टप्प्याच्या अनुदानापासूनही २१० लाभार्थी वंचित आहेत. या सर्व लाभार्थीनी घरकु लाच्या कामासाठी आपले पूर्वीचे कुडामातीचे घर पाडले आणि अनेकांचे काम अर्ध्यावर आले. यासाठी त्यांनी कर्जही काढले; परंतु वर्षभराचा कालावधि उलटला तरी, त्यांना अनुदानाचे हपते नियमानुसार मिळालेले नाहीत. 

जिल्ह्यातील मंजूर झालेल्या घरकुलांच्या लाभार्थींना नियमानुसार अनुदानाचे वितरण करण्यात येत आहे. तांत्रिक कारणामुळे काही लाभार्थींचे अनुदान प्रलंबित असले तरी, त्यांना ते मिळणार आहेच. घरकुलाच्या अनुदानापासून नियमानुसार वंचित कोणालाही ठेवता येत नाही; परंतु लाभार्थींनी घरकुलाचे काम नियमानुसार करणे आवश्यक आहे.    

-के. एम. अहमद 
प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास संस्था, वाशिम 

Web Title: Waiting for Grant Beneficiary Beneficiaries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.