सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील वैद्यकीय उपकरणांना इन्स्टॉलेशनची प्रतीक्षा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 10:43 AM2021-05-27T10:43:11+5:302021-05-27T10:45:30+5:30
Super specialty hospital in Akola : आवश्यक वैद्यकीय उपकरणे येऊन दोन वर्षांपेक्षा जास्त कालावधी झाला आहे
अकोला : अकोल्यात सुपर स्पेशालिटी रुग्णालयाला मंजुरी मिळून सहा वर्षांपेक्षा जास्त कालावधीत झाला असून रुग्णालय इमारतीचे बांधकामही पूर्ण झाले आहे. त्यासाठी आवश्यक वैद्यकीय उपकरणे येऊन दोन वर्षांपेक्षा जास्त कालावधी झाला आहे, मात्र पदभरतीअभावी या अत्यावश्यक वैद्यकीय उपकरणांचे अद्याप इन्स्टॉलेशन झालेले नाही. परिणामी कोट्यवधी किमतीचे ही वैद्यकीय उपकरणे वापराविनाच धूळखात पडून आहेत.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयांतर्गत राज्यातील चार सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलला मान्यता देण्यात आली होती. हॉस्पिटलच्या निर्माण कार्यासाठी जानेवारी २०१४ मध्ये केंद्र व राज्य सरकारकडून कोट्यवधींचा निधी मंजूर करण्यात आला. त्यानुसार, अकोल्यातील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या बांधकामाला सुरुवात झाली. इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले आहे; परंतु अद्यापही या ठिकाणी आवश्यक पदांची भरती झाली नाही. इमारतीचे बांधकाम सुरू असतानाच कोट्यवधी किमतीच वैद्यकीय उपकरणेही येथे दाखल झाली, मात्र या वैद्यकीय उपकरणांच्या इंस्टॉलेशनसाठी आवश्यक तंत्रज्ञच उपलब्ध नाहीत. परिणामी कोट्यवधीचे ही वैद्यकीय उपकरणे निर्माणाधीन इमारतीच्या परिसरातच ठेवण्यात आली आहेत.
या उपकरणांचे इन्टॉलेशन नाही
सीटी स्कॅन, एमआरआय, हार्ट चेक-अप उपकरणे, एक्स-रे, व्हेंटिलेटर यासह इतर आवश्यक वैद्यकीय उपकरणे आली आहेत. मात्र, तंत्रज्ञाअभावी रुग्णालय परिसरातच ते पडून आहेत.
...तर रुग्णांना मोठा आधार
सुपर स्पेशालिटी रुग्णालय हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतर्गत कार्यरत असणार आहे. त्यामुळे येथील सीटी स्कॅन, एमआरआय, हार्ट चेक-अप उपकरणे, एक्स-रे आणि व्हेंटिलेटरचा उपयोग गरजू रुग्णांना सहज शक्य होईल. सर्वसामान्य जनतेला याचा सर्वाधिक आधार मिळेल.
प्रामुख्याने सीटी स्कॅनचा विचार केल्यास खासगी रुग्णालयात सीटी स्कॅनसाठी रुग्णांना चार हजार रुपयांपेक्षा जास्त पैसे मोजावे लागतात. या ठिकाणी रुग्णांना अत्यल्प दरात सीटी स्कॅनची सेवा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे रुग्णांचा मोठ्या प्रमाणात पैसाही वाचेल.
वैद्यकीय उपकरणांचे इंस्टॉलेशन झाल्यास रुग्णांना कर्करोग, मूत्रपिंड, एंडोक्राइनोलॉजी आजारांच्या निदानासह त्यावरील तांत्रिक उपचार करणेही येथे शक्य होणार आहे. यासोबतच रुग्णांची मोठी आर्थिक बचतही होणार आहे.
वैद्यकीय उपकरणांच्या इंस्टॉलेशनअभावी कार्डियोलॉजी, सीटीव्हीएस, न्यूरोलॉजी, न्यूरो सर्जरी आणि इतर मोठ्या आजारांवरील तांत्रिक उपचार अद्यापही सुरू होऊ शकले नाही. उपकरणांचे इंस्टॉलेशन झाल्यास हे सर्वच उपचार अकोल्यात शक्य होणार आहे. त्यासाठी वैद्यकीय उपकरणे सुरू होणे अपेक्षित आहे.
सुपर स्पेशालिटी रुग्णालयात पडून असलेली कोट्यवधींची वैद्यकीय उपकरणे सुरू झाल्यास तसेच आवश्यक तज्ज्ञ मनुष्यबळ उपलब्ध झाल्यास अकोल्यातच सुपर स्पेशालिटी ब्लॉक किंवा ट्रॉमा सेंटर आणि इतर आवश्यक सुविधा मिळणे शक्य होणार आहे.
या सर्व सुविधा शासकीय रुग्णालयात एकाच ठिकाणी उपलब्ध झाल्यास रुग्णांना उपचारासाठी बाहेरगावी जावे लागणार नाही. तसेच खासगी रुग्णालयात येणारा खर्चही त्यांना सोसावा लागणार नाही. त्यामुळे अकोल्यासह शेजारील जिल्ह्यातील रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.
खासगी रुग्णालय न परवडणारे
सीटी स्कॅनसाठी खासगी रुग्णालयात ४ हजारापेक्षा जास्त पैसे मोजावे लागतात. यामध्ये विविध प्रकारच्या सीटीस्कॅनचे दर वेगवेगळी असल्याने हा खर्च रुग्णांना परडणारा नाही. खासगी रुग्णालयात प्रत्येक गोष्टीसाठी रुग्णांच्या नातेवाईकांना पैसे मोजावे लागतात.
सीटी स्कॅनप्रमाणेच एमआरआयसाठीही पैसा मोजावा लागतो. इतर औषधोपचारासोबतच महागळ्या चाचण्या सर्वसामान्य रुग्णांच्या आवाक्याबाहेर आहे. अशा परिस्थितीत शासकीय यंत्रणेमार्फत या तपासण्या झाल्यास रुग्णांना मोठा दिलासा मिळू शकतो.
लहानमोठ्या चाचण्यांसाठीही खासगी रुग्णालयांमध्ये पाच ते दहा हजार रुपयांपर्यंतचे देयक अदा करावे लागते. त्यामुळे केवळ चाचण्यांमध्येच हजारो रुपयांचा खर्च येतो. याशिवाय, रुग्णाचा उपचार बाजूलाच राहतो. त्यामुळे सध्याच्या स्थितीत सर्वसामान्य रुग्णांना खासगी रुग्णालय परवडणारे नाही.