शेतकऱ्यांच्या मदतीसाठी २६ कोटी निधीची प्रतीक्षा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2020 10:58 AM2020-12-02T10:58:25+5:302020-12-02T10:58:33+5:30
Agriculture News २६ कोटी ७८ लाख रुपयांचा निधी अद्याप शासनाकडून प्राप्त झाला नाही.
अकोला: यावर्षीच्या पावसाळ्यात सतत पाऊस आणि पुरामुळे पिकांचे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसानभरपाइची मदत देण्यासाठी शासनाकडून पहिल्या टप्प्यात प्राप्त झालेली २६ कोटी ७८ लाख ७३ हजार रुपयांची मदत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी वितरित करण्यात आली असून, दुसऱ्या टप्प्यातील मदत निधीपोटी २६ कोटी ७८ लाख रुपयांचा निधी अद्याप शासनाकडून प्राप्त झाला नाही. त्यामुळे मदतीचा निधी केव्हा प्राप्त होणार, याबाबत जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांकडून प्रतीक्षा केली जात आहे.
यावर्षीच्या पावसाळ्यात जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत पाऊस आणि पुरामुळे जिल्ह्यात ६९ हजार ५५४ शेतकऱ्यांचे ५१ हजार ७४९ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले. त्यामध्ये मूग, उडीद, सोयाबीन, कपाशी, तूर पिकांच्या नुकसानीचा समावेश आहे. पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून ५५ कोटी रुपयांच्या मदतनिधीची मागणी शासनाकडे करण्यात आली होती. त्या अनुषंगाने शासनाकडून पहिल्या टप्प्यात २६ कोटी ७८ लाख ७३ हजार रुपयांचा मदतनिधी १० नोव्हेंबर रोजी प्राप्त झाला. उपलब्ध मदतीची अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत तहसील कार्यालयांना वितरित करण्यात आली. तहसील कार्यालयांकडून मदतीची रक्कम बँकांमध्ये जमा करण्यात आली असून, मदतीची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. पहिल्या ३८ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात मदतीची रक्कम जमा करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असली तरी, जिल्ह्यातील उर्वरित अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना पीक नुकसानभरपाईची मदत वाटप करण्यासाठी दुसऱ्या टप्प्यात २६ कोटी ७८ लाख रुपयांचा मदतनिधी अद्याप शासनाकडून प्राप्त झाला नाही. त्यामुळे शासनाकडून मदतनिधी केव्हा उपलब्ध होणार, याबाबत मदतीपासून वंचित असलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून प्रतीक्षा केली जात आहे.