दुसऱ्या डोसची प्रतीक्षा संपली; गुरुवारपासून लसीकरणाला होईल प्रारंभ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2021 10:34 AM2021-05-04T10:34:13+5:302021-05-04T10:34:20+5:30
Corona Vaccination : ४५ वयोगटावरील लाभार्थींची लसीची प्रतीक्षा संपली असून, गुरुवारपासून लसीकरणाला सुुरुवात होणार आहे.
अकोला: गत काही दिवसांपासून लसीचा साठा उपलब्ध नसल्याने ४५ वर्षांवरील अनेकांना लस मिळणे कठीण झाले होते. लसीअभावी अनेकांना दुसरा डोसही मिळत नव्हता. त्यामुळे अनेकांना लस न घेताच केंद्रावरून परतावे लागायचे; मात्र ४५ वयोगटावरील लाभार्थींची लसीची प्रतीक्षा संपली असून, गुरुवारपासून लसीकरणाला सुुरुवात होणार आहे. त्यासाठी केंद्र शासनाकडून लसीचा मोठा साठा बुधवारी सायंकाळपर्यंत मिळणार असल्याची माहिती आहे. केंद्र शासनामार्फत ४५ वर्षांवरील सर्वांनाच मोफत कोविड लसीकरणाची मोहीम राबविण्यात येत आहे. मध्यंतरी केंद्र शासनामार्फत कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लसीचा पुरवठा खंडित झाला होता. तसेच १ एप्रिलपासून राज्य शासनामार्फत १८ ते ४५ वर्ष वयोगटातील लाभार्थींच्या लसीकरणाला सुरुवात करण्यात आली होती. ४५ वर्षावरील लाभार्थींसाठी मर्यादित डोस शिल्लक असल्याने मोजक्याच केंद्रावर लसीकरण राबविण्यात आले होते. त्यामुळे इतर केंद्रांवर ४५ वर्षापेक्षा जास्त वयोगटातील लाभार्थींना लसीपासून वंचित राहावे लागले. कोणाला पहिला, तर कोणारा दुसरा डोस मिळणे कठीण झाले होते, मात्र लसीची ही प्रतीक्षा आता संपली असून बुधवारी सायंकाळपर्यंत जिल्ह्याला कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लसीचा मोठा साठा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे गुरुवारपासून जिल्ह्यातील बहुतांश केंद्रावर लसीकरण होणार आहे.
लसीकरणाच्या दोन मोहीम
कोविड लसीकरण मोहीम ही केंद्र आणि राज्य शासनामार्फत स्वतंत्र राबविण्यात येत आहे. त्यामुळे अनेकांना लस न मिळाल्याने संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे.
राज्य शासनाची मोहीम
१ मेपासून १८ ते ४५ वर्षे वयोगटातील लाभार्थींच्या लसीकरणास सुरुवात झाली. या गटासाठी राज्य शासनाकडून लसीचा पुरवठा केला जात असून, यामध्ये केवळ १८ ते ४५ याच वयोगटातील लाभार्थींना लस दिली जाणार आहे.
केंद्र शासनाची माेहीम
४५ वर्षावरील वयोगटातील लाभार्थींसाठी केंद्र शासनाकडून लस पाठविण्यात येत असून, या गटातील पहिला व दुसरा डोस या लसीच्या साठ्यातून दिला जाणार आहे. त्यामुळे ज्या केंद्रावर १८ ते ४५ वर्ष वयोगटातील लाभार्थींचे लसीकरण सुरू आहे, अशा केंद्रावर नियोजन नसेल, तर ४५ वर्षांवरील लाभार्थींना लस दिली जाणार नसल्याची माहिती आहे.
बुधवारी केंद्र शासनामार्फत लस मिळणार आहे. यामध्ये कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन दोन्ही लसींचा समावेश असण्याची शक्यता आहे. त्यामुळे गुरुवारपासून ४५ वर्षांवरील लाभार्थींच्या लसीकरणास सुरुवात होईल.
- डॉ. मनिष शर्मा, जिल्हा समन्वयक, कोविड लसीकरण, अकोला.