चारचाकीचे वेटिंग सहा महिन्यांवर; जुन्या गाड्यांचा बाजार फुलला!
By Atul.jaiswal | Published: December 22, 2021 10:45 AM2021-12-22T10:45:20+5:302021-12-22T10:50:42+5:30
Waiting six months for car delivery : सेमी कंडक्टर चीपचा जगभरात तुटवडा असल्याने कारनिर्मितीवर परिणाम झाला आहे.
- अतुल जयस्वाल
अकोला : कोरोनाची लाट ओसरल्यानंतर ऑटोमोबाइल क्षेत्रात तेजी आली असून, चारचाकी वाहनांची विक्री मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सर्वच कंपन्यांच्या कारला मोठी मागणी असली, तरी ग्राहकांना मात्र कार डिलिव्हरीसाठी चार ते सहा महिन्यांची वाट पाहावी लागत आहे. यामध्ये टॉप एन्ड कारच्या डिलिव्हरीसाठीची प्रतीक्षा यादी जास्त आहे. कार उत्पादनासाठी महत्त्वाचा घटक असलेल्या सेमी कंडक्टर चीपचा जगभरात तुटवडा असल्याने कारनिर्मितीवर परिणाम झाला असून, मागणी असतानाही कार कंपन्या डिलिव्हरी देण्यात अपयशी ठरत आहेत. यंदा दिवाळीनंतर कारच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. अकोल्यातील सर्वच कंपन्यांच्या शोरूममध्ये कारची बुकिंग होत आहे. परंतु, प्रत्यक्षात कार डिलिव्हरीसाठी ग्राहकांना प्रतीक्षाच करावी लागत आहे. बेस मॉडेलच्या गाड्यांची डिलिव्हरी मात्र तुलनेने लवकर मिळत आहे.
का मिळत नाही लवकर कार?
सर्वच प्रकारच्या कारचे उत्पादन भारतात होत असले, तरी त्यात वापरल्या जाणाऱ्या सेमी कंडक्टर चीप १०० टक्के आयातच कराव्या लागतात. जगभरात सेमी कंडक्टर चीपचा तुटवडा निर्माण झाला आहे.
त्याचा परिणाम सर्वच कंपन्यांच्या कारनिर्मितीवर झाला आहे. मागणी असूनही कार कंपन्या वेळेवर डिलिव्हरी देण्यात अपयशी ठरत आहेत.
आता बुक करा, गुढीपाडव्याला मिळवा
आपल्याकडे अनेक जण शुभमुहूर्तावर गाडी घेतात. परंतु, सध्या कारची डिलिव्हरी मिळविण्यासाठी मोठी प्रतीक्षा यादी असल्याने अनेक जण आधीच कारची बुकिंग करून ठेवत आहेत. गुढीपाडव्याला कार खरेदी करावयाची असेल, तर आतापासूनच बुकिंग करून ठेवावी लागणार आहे.
हचबॅक, एसयूव्ही गाड्यांना बाजारपेठेत मोठी मागणी
हचबॅक प्रकारच्या गाड्यांना नेहमीच मागणी असते. परंतु, उच्च मध्यमवर्गीय ग्राहकांचा कल एसयूव्ही गाड्या खरेदी करण्याकडे अधिक आहे. हचबॅक प्रकारातील गाड्या पाच ते सात लाखांपर्यंत, तर एसयूव्ही प्रकारातील गाड्या ८ ते १२ लाखांपर्यंत उपलब्ध आहेत.
जुन्या गाड्यांना मागणी वाढली
नव्या कार उपलब्ध होत नसल्याने अनेक ग्राहक सेकंड हॅण्ड गाड्यांकडे वळले असून, या गाड्यांची मागणी वाढली आहे. परिणामी जुन्या कार विक्रीचा व्यवसाय वाढला आहे. किमान २ ते ५ लाख रुपयांपर्यंत गाड्या मिळत असून, या व्यवसायातून मोठी उलाढाल होत आहे. कोरोनानंतर स्वत: चे वाहन असावे, अशी प्रत्येकाला वाटत असल्यामुळेही सेकंड हॅण्ड कारची विक्री वाढली आहे.
ऑटो इंडस्ट्रीचे तज्ज्ञ म्हणात
सेमी कंडक्टर चिपच्या टंचाईमुळे कार उत्पादन प्रभावित झाले आहे. त्यामुळे कारच्या डिलेव्हरीसाठी उशीर होत आहे. टॉप ॲण्ड मॉडेलच्या डिलेव्हरीसाठी जास्त वेळ लागत आहे. बेस मॉडेलच्या गाड्यांसाठी जास्त प्रतीक्षा करावी लागत नाही.
- वसंतबाबू खंडेलवाल, कार व्यावसायिक, अकोला
सर्वच कंपन्यांच्या कारच्या डिलेव्हरीसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे, असे म्हणता येणार नाही. तथापी, सेमी कंडक्टरच्या तुटवड्यामुळे कार उत्पादन प्रभावित झाले आहे. त्यामुळे काही कारच्या डिलेव्हरीला वेळ लागत आहे.
- वसीम शेख, ऑटो इंडस्ट्री तज्ज्ञ