दमदार पावसाची प्रतीक्षा; पेरण्या खोळंबल्या

By admin | Published: July 3, 2017 01:36 AM2017-07-03T01:36:59+5:302017-07-03T01:36:59+5:30

समाधानकारक पाऊस नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त, बोरगाव वैराळे परिसरातील खरीप पेरणी अंतिम टप्प्यात

Waiting for strong rain; Sowing out | दमदार पावसाची प्रतीक्षा; पेरण्या खोळंबल्या

दमदार पावसाची प्रतीक्षा; पेरण्या खोळंबल्या

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बोरगाव वैराळे : बाळापूर तालुक्याच्या शेवटच्या टोकाला असलेल्या बोरगाव वैराळे परिसरात शेतकऱ्यांची खरिपाची पेरणी अंतिम टप्प्यात आहे. शेतकऱ्यांनी महागडे बियाणे शेतात पेरले असून, समाधानकारक पाऊस न पडल्यामुळे पेरणी केलेले बियाणे उगवते किंवा नाही, अशा द्विधा मन:स्थितीत शेतकरी सापडला आहे.
मागील पाच वर्षांत कधी कमी पावसामुळे तर कधी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना खरीप हंगामात आलेले पीक अपेक्षित उत्पन्न देऊ शकले नसल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. तरीही यावर्षी हवामान खात्याने चांगला पाऊस होण्याचा अंदाज वर्तविल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी हिंमत करून मृग नक्षत्रात खरिपाच्या कपाशी, सोयाबीन, तूर, मूग, ज्वारी, उडीद या पिकाची पेरणी केली; मात्र पेरणीनंतर पावसाने दडी मारल्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना दुबार पेरणीच्या संकटाला सामोरे जाण्याची वेळ आली आहे. बोरगाव वैराळे परिसरात खरिपाची ८० टक्के पेरणी आटोपली असून, येत्या दोन दिवसांत १०० टक्के पेरण्या आटोपण्याची शक्यता आहे; मात्र या पेरण्या झाल्यानंतर जर आठवडाभरात पाऊस आला नाही, तर ५० ते ६० टक्के शेतकऱ्यांना दुबार पेरणीच्या संकटाचा सामना करावा लागणार आहे. सतत चार वर्षांपासून प्रत्येक संकटाला तोंड देता शेतकऱ्यांच्या नाकीनऊ आले आहेत. या परिसरातील शेतकऱ्यांना महागडे बियाणे, रासायनिक खते उसनवारी करून आणावी लागतात. त्यामुळे पेरणी झाल्यानंतर पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.

आगर: दुबार पेरणीचे संकट
मृग नक्षत्राच्या आगमनानंतर पावसाने दडी मारल्याने खरीप हंगामी पेरण्या खोळंबल्या असून, ज्या शेतकऱ्यांनी पेरणी केलेली आहे, अशा सर्वच शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे. मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर पडलेल्या दमदार पावसाने अनेक शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरणीस सुरुवात करून मूग, सोयाबीन, उडीद आदी पिकांची पेरणी केली; पण पाऊस थांबल्याने उर्वरित पेरण्या थांबवून शेतकरी पावसाची प्रतीक्षा करत आहे. चालू आठवड्यात पाऊस न आल्यास खरीप हंगामातील सर्वच पिकातील उत्पन्न घटणार असल्याची भीती व्यक्त होत असून, शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहत आहे.

सौंदळा परिसरात पाण्याची पातळी खालावली
सौंदळा परिसरातील शेतकऱ्यांनी ८० टक्क्यांहून अधिक प्रमाणात पेरणी केली आहे. यापैकी ६० टक्के क्षेत्रात कपाशीची पेरणी केली असल्यामुळे यावर्षी सर्वात जास्त पेरा कपाशी पिकाचा झाला आहे. या मान्सूनपूर्व कपाशीची लागवड केलेल्या शेतकऱ्यांनाही पावसाची आस लागली आहे. या परिसरातील विहिरी कोरड्या पडल्या असून, ट्युबवेलमधील पाण्याची पातळीदेखील खोल गेलेली आहे. पाऊस लांबल्याने स्प्रिंकलरद्वारे पिकांना अहोरात्र पाणी देणे सुरू आहे. काही शेतकऱ्यांची शेती कोरडवाहू असल्याने या शेतकऱ्यांना पावसाची नितांत गरज भासत आहे. सर्व शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागले असून, पाऊस केव्हा बरसेल, याची वाट ते चातकासारखी पाहत आहेत.

माना परिसरात पेरणीस सुरुवात
यावर्षी हवामान खात्याने दमदार पाऊस होण्याचा अंदाज वर्तविल्याने बळीराजा आनंदात आहे. मागील दोन दिवसांपासून थोड्याफार प्रमाणात आलेल्या पावसामुळे माना परिसरातील शेतकऱ्यांनी सोयाबीन, कापूस, तूर, मूग पेरणीस सुरुवात केली. यावर्षी मृग नक्षत्रात समाधानकारक पाऊस झाल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. काही शेतकऱ्यांनी मान्सूनपूर्व पाऊस झाल्याने पेरण्या आटोपल्या; पण मागील १५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पेरलेले बियाणे मातीतच करपले आहे. काही ठिकाणी ओलावा असलेल्या जमिनीतील बियाण्यांना मोड येऊन ते सडले. कोरडवाहू जमिनीतील बियाणे नष्ट होण्याच्या मार्गावर होते. अशातच मागील दोन दिवसांत थोडाफार पाऊस पडल्याने माना परिसरातील शेतकरी सुखावला असून, मजूर पेरणी, वेचणी व वाही पेरी करण्याच्या कामात लागला आहे.

Web Title: Waiting for strong rain; Sowing out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.