सुपर स्पेशालिटीची प्रतीक्षा कायम; अंतर्गत बदलांसाठी भिंतींची तोडफोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2019 12:29 PM2019-02-27T12:29:55+5:302019-02-27T12:30:22+5:30
अकोला: सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचे ८५ टक्के बांधकाम पूर्ण झाले असून, वैद्यकीय उपकरणे येण्यासही सुरुवात झाली आहे; मात्र या उपकरणांसाठी इमारतीमध्ये अंतर्गत बदलासाठी आतील काही भिंती तोडण्यात येत आहेत.
अकोला: सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचे ८५ टक्के बांधकाम पूर्ण झाले असून, वैद्यकीय उपकरणे येण्यासही सुरुवात झाली आहे; मात्र या उपकरणांसाठी इमारतीमध्ये अंतर्गत बदलासाठी आतील काही भिंती तोडण्यात येत आहेत. त्यामुळे इमारतीचे बांधकाम पूर्णत्वास येण्यास आणखी काही महिन्यांची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
अकोल्यात सुपर स्पेशालिटी रुग्णालयासाठी १ जानेवारी २०१४ रोजी १५० कोटींचा निधी मंजूर झाला. त्यातील निम्म्या खर्चाची तरतूद इमारतीच्या बांधकामासाठी करण्यात आली. त्यानुसार मागील तीन वर्षांपासून इमारतीचे बांधकाम सुरू आहे. नियोजनानुसार आॅक्टोबर २०१८ मध्ये इमारतीचे बांधकाम पूर्णत्वास येणे अपेक्षित होते; परंतु या कालावधीत इमारतीचे बांधकाम पूर्ण न झाल्याने दोन वेळा मुदत वाढ देण्यात आली. याच दरम्यान वैद्यकीय उपकरणे येण्यास सुरुवात झाली; पण यातील काही उपकरणांचा आकार मोठा असल्याने इमारतीमध्ये अंतर्गत बदल करण्यात येत आहेत. यामध्ये काही खोल्यांच्या भिंती पाडाव्या लागत आहे. अंतर्गत बदलांसह इतर काही तांत्रिक बाबींमुळे इमारत बांधकाम पूर्णत्वास येण्यासाठी आणखी पाच ते सहा महिन्यांचा कालावधी प्रतीक्षा करावी लागण्याची शक्यता आहे.
नेमकी अडचण काय?
सुपर स्पेशालिटीला मान्यता मिळताच केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुंबई कार्यालर्यालयामार्फत नकाशा तयार करण्यात आला; परंतु त्यावेळी वैद्यकीय उपकरणे खरेदीसंदर्भात कुठलेच निर्णय न झाल्याने त्यांचे योग्य माप प्राप्त झाले नव्हते. अशा परिस्थितीत तयार करण्यात आलेल्या नकाशानुसार इमारतीचे बांधकाम करण्यात आले. इमारतीचे बांधकाम ५० टक्क्यांपेक्षा जास्त झाल्यानंतर वैद्यकीय उपकरणाची प्रक्रिया पूर्ण झाली. त्यामुळे हे अंतर्गत बदल करण्यात येत असल्याने सुपर स्पेशालिटीची आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
इमारतीच्या बांधकामाची जबाबदार सीपीडब्ल्यूडी विभागाची असली, तरी अंतर्गत दुरुस्तीची जबाबदारी आरोग्य विभागाच्या एचएलएल खात्याकडे आहे. त्यामुळे वैद्यकीय उपकरणे बसविताना इमारतीमध्ये अंतर्गत बदल करायचे असल्यास त्याचा खर्च एचएलएल विभागालाच करावा लागतो. या खर्चाची तरतूद करारामध्येच केलेली असल्याने अतिरिक्त खर्च होत नसल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली.
- धनंजय चिवंडे, सहायक अभियंता, केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभाग
इमारतीचे ८५ टक्के बांधकाम पूर्ण झाले. मार्च २०१९ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून, बांधकाम पूर्णत्वास आल्यावरच सुपर स्पेशालिटीच्या उद््घाटनाचा मुहूर्त निघणार आहे.
- डॉ. कुसुमाकर घोरपडे, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला