कोविड लस स्टोअरेजसाठी ‘वॉक इन कूलर’ची प्रतीक्षा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:17 AM2021-02-07T04:17:15+5:302021-02-07T04:17:15+5:30
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अकोला मंडळात कोविड लसीकरणाची तयारी सुरू असताना लसीच्या साठवणुकीची तयारीही केली जात होती. इतर लसींच्या साठवणुकीसाठी ...
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अकोला मंडळात कोविड लसीकरणाची तयारी सुरू असताना लसीच्या साठवणुकीची तयारीही केली जात होती. इतर लसींच्या साठवणुकीसाठी आरोग्य सेवेच्या अकोला मंडळासाठी केंद्र शासनामार्फत ४० क्युबिक मीटर क्षमतेचा वॉक इन कूलर तसेच ८२ लहान ‘आइस लाईन्ड रेफ्रिजरेटर’ नियोजित होते. कोविड लसीकरणाच्या सुरुवातीलाच यातील ८२ लहान ‘आइस लाईन्ड रेफ्रिजरेटर’ उपलब्ध झाले होते. हे सर्व विभागातील पाचही जिल्ह्यांमध्ये वितरित करण्यात आले. मात्र, वॉक इन कूलरची प्रतीक्षा अजूनही कायम आहे. येत्या काळात कोविड लसीकरणाची व्याप्ती वाढणार असून, लसीचे डोसदेखील मोठ्या प्रमाणात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही लस साठवणुकीसाठी आवश्यक क्षमता असणे अनिवार्य आहे. यासोबतच लसीचे डोस मंडळांतर्गत विविध जिल्ह्यांत पोहोचविण्यासाठी वॅक्सिन व्हॅनची मागणी केली होती, तीदेखील प्रलंबित असल्याची माहिती आहे.
आवश्यक साहित्य येण्यास सुरुवात
वॉक इन कूलरसाठी आवश्यक स्टॅबिलायझर आरोग्य उपसंचालक कार्यालयास प्राप्त झाल्याची माहिती आहे. याशिवाय, लवकरच जनरेटरदेखील उपलब्ध होणार असून, त्यानंतरच वॉक इन कूलर उपलब्ध होणार असल्याची माहिती आहे.