वान धरणाचे पाणी पेटले; शेतकर्यांचा तहसीलला घेराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2017 02:22 AM2017-11-16T02:22:02+5:302017-11-16T02:26:00+5:30
तालुक्यातील वान धरणातील पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस चिघळत असून, सिंचनाकरिता पाणी मिळावे, यासाठी शेतकरी आक्रमक आहेत. या दृष्टिकोनातून १५ नोव्हेंबर रोजी तालुक्यातील शेकडो शेतकर्यांनी लोकप्रतिनिधी व शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करीत तहसील कार्यालयावर मोर्चा नेला तसेच कार्यालयाला घेराव घालीत तब्बल दोन तास ठिय्या आंदोलन केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
तेल्हारा : तालुक्यातील वान धरणातील पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस चिघळत असून, सिंचनाकरिता पाणी मिळावे, यासाठी शेतकरी आक्रमक आहेत. या दृष्टिकोनातून १५ नोव्हेंबर रोजी तालुक्यातील शेकडो शेतकर्यांनी लोकप्रतिनिधी व शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करीत तहसील कार्यालयावर मोर्चा नेला तसेच कार्यालयाला घेराव घालीत तब्बल दोन तास ठिय्या आंदोलन केले. सिंचनासाठी आवश्यक असणारे पाणी मिळाले नाही, तर आमदार-खासदारांना गावबंदी करून धरणावर ताबा करण्याचा निर्णय शेतकर्यांनी घेतला. दरम्यान, शेतकर्यांच्या प्रतिनिधी मंडळासोबत तहसीलदार डॉ. संतोष येवलीकर यांनी चर्चा करून शेतकर्यांच्या भावना वरिष्ठांना कळविण्याचे आश्वासन दिले.
शेतकर्यांच्या सिंचनासाठी वरदान ठरलेले तालुक्यातील वान नदीवरील हनुमान सागर हे धरण दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा १00 टक्के भरले आहे. या धरणामुळे तालुक्यातील जवळजवळ १५ हजार हेक्टर शेती सिंचनाखाली येते. सिंचनाच्या उद्देशाने बांधल्या गेलेल्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पातून गेल्या काही वर्षांपासून जळगाव जामोद, संग्रामपूर, शेगाव, तेल्हारा, अकोट या शहरांसह महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाद्वारे ८४ खेडी पाणी पुरवठा योजनेंतर्गत नागरिकांना पिण्यासाठी पाणी पुरवठा केला जात आहे. धरणातील शेतकर्यांच्या वाट्याचे जवळजवळ ७0 टक्के पाणी पिण्यासाठी आरक्षित करून पळविले गेले आहे. गाळ व बाष्पीभवनाची टक्केवारी वगळता या धरणाचे अत्यल्प पाणी शेतकर्यांना सिंचनासाठी मिळत होते. त्यामुळे या पाण्यावर होणारे १४ हजार हेक्टर सिंचन क्षेत्र प्रभावित झाले. उर्वरित साठय़ातील पाण्यात शेतकर्यांना सिंचनासाठी पाणी मिळत होते; परंतु हे पाणी अकोला येथे पिण्याच्या पाण्याच्या नावाखाली पळविण्याचा घाट शासनाने रचला आहे. आधीच नापिकीने, शेतमालाच्या पडलेल्या भावाने खचलेल्या शेतकर्याचे हक्काचे पाणी पळवून रब्बीचे स्वप्न शासनाकडून भंगविले जात असल्याचे पाहून शेतकरी आक्रमक झाले आहेत. वारंवार निवेदने देऊनही काहीही उपयोग होत नसल्याने १३ नोव्हेंबर रोजी वान प्रकल्पासमोर अकोट मतदारसंघाचे आमदार प्रकाश भारसाकळे यांची गाडी अडवून शेतकर्यांनी आपला संताप व्यक्त केला होता परंतु त्यानेही काहीच उपयोग न झाल्याने शेतकर्यांनी १५ नोव्हेंबर रोजी शहरातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळून मोर्चा काढून तहसील कार्यालयाला घेराव घालीत दोन तास ठिय्या दिला.
या आंदोलनात शेतकरी संघटनेचे ललित बहाळे, तालुका अध्यक्ष कौतकार, विलास ताथोड यांच्यासह तालुक्यातील बेलखेड, कोठा, माळेगाव बा., वाडी, रायखेड, इसापूर, उकळी, पिंपरी, माळेगाव इत्यादी गावांतून मोठय़ा संख्येने शेतकरी सहभागी झाले होते. ठाणेदार सचिंद्र शिंदे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.